चाचणी लेखापरीक्षणाला सर्वतोपरी सहकार्य; मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांचे स्पष्टीकरण
केडीसीसी बँकेचा सर्व कर्ज पुरवठा नियमानुसारच आहे. चाचणी लेखापरीक्षणासाठी सरकारला सर्व ती माहिती देऊन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे स्पष्टीकरण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले आहे.
या पत्रकात डॉ. माने यांनी पुढे म्हटले आहे, बँकेने थेट व सहभागीता योजने अंतर्गत एकूण २९ साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा केलेला आहे. सर्वच कर्जांसाठी योग्य व पुरेसे तारण घेऊन शिखर बँक व नाबार्डच्या धोरणानुसारच कर्जपुरवठा केलेला आहे. यापैकी तपासणी करण्यात येत असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना व ब्रिस्क फॅसिलिटीज या कारखान्यांचा समावेश आहे. या साखर कारखान्यांनासुद्धा इतर २७ साखर कारखान्यांप्रमाणेच नियमानुसार कर्जपुरवठा केलेला आहे. त्यासाठी पुरेसे तारणही घेतलेले आहे. तसेच, ही दोन्हीही खाती एनपीएमध्ये नाहीत.
बँकेचे दरवर्षी वैधानिक लेखा परीक्षण, वैधानिक तपासणी, शिखर बँक तपासणी, अंतर्गत सी. ए. तपासणी केली जाते. या तपासण्यांमध्ये सर्व कर्जांची व व्यवहारांची तपासणी होत असते. विशेषता: साखर कारखाने, सुत गिरण्या यासारख्या मोठ्या कर्जखात्यांचीही तपासणी सविस्तरपणे होत असते. अशा तपासण्यांचा अहवाल सर्व यंत्रणांना उपलब्ध करून दिलेला आहे. यामध्ये कोणतीही अनियमितता नसून कार्यालयीन शिफारशीशिवाय संचालक मंडळ बैठकीत अशी कोणतीही कर्जे मंजूर केली जात नाहीत. अशा कर्जमंजुरीवेळी कारखान्यांची सर्व मालमत्ता तारणापोटी घेतली जाते. तसेच, साखरसाठा, इथेनॉल, मोलॅसिस, बगॅस इत्यादी उपपदार्थही तारण म्हणून घेतले जातात. त्यामुळे अशा साखर कारखान्यांची कर्जे सुरक्षित आहेत.
बँकेकडे ३९,०५३ शेतकऱ्यांच्या नावे प्रत्येकी दहा हजार रुपयांची ठेव ठेवून त्यावरती तारण कर्ज काढून सरसेनापती साखर कारखान्याचे शेअर्स खरेदीच्या मुद्द्यावर बँकेने यापूर्वी वेळोवेळी वस्तुनिष्ठ खुलासा केलेला आहे. कदाचित; साखर कारखाना उभारणीसाठी गोळा केलेले शेअर्स व घेतलेली ठेवतारण कर्जे याबद्दल गैरसमजातून गल्लत होत असावी, असे वाटते. अशा प्रकारची कोणतीही विशिष्ट तक्रार बँकेकडे आलेली नाही. तसेच, अशा प्रकारच्या ठेवीदाराचे नाव, शाखा किंवा कालावधी अशा प्रकारचा कोणताही तपशीलही दिलेला नाही. त्यामुळे, सदरचा मुद्दा गैरसमज पसरविणारा आहे. बँक सरकारच्या चाचणी लेखापरीक्षणाला सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. बँकेची सर्व यंत्रणा तोंडावरच आलेल्या ३१ मार्चच्या ठेव ईष्टांक, एनपीए कमी करण्यासाठी वसुली इष्टांक अशा विविध उद्दिष्टांच्या पूर्तींसाठी कार्यरत आहे.