भोगावती / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढविण्याचा निर्धार राधानगरी तालुका काँग्रेसच्यावतीने सोमवारी घेण्यात आला. गेली पंचवीस वर्षे काँग्रेसवर अन्याय झाला आहे. त्यामुळे बँकेचे विद्यमान संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांच्या विरोधात राधानगरी काँग्रेसच्या वतीने संस्था गटातून भोगावतीचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वनाथ पाटील यांच्या नावाची घोषणा सोमवारी भोगावती येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली.कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस लढविणारच असल्याचे राधानगरी तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले व गोकुळचे माजी संचालक पी डी धुंदरे यांनी यावेळी जाहीर केले आहे. या निर्णयाने ए.वा.यांच्या विरोधात सर्व पक्षीय विरोधकांची एकजूट होण्याची शक्यता असुन राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व नसल्याने
राधानगरी तालुका काँग्रेस पक्षाचे खच्चीकरण झाले आहे. पंचवीस वर्षे जिल्हा बँकेच्या माध्यमातून काँग्रेस संपविण्याचा प्रयत्न ए वाय यांच्या कडून झाला आहे. सोमवारी कोल्हापूर येथील बैठकीत राधानगरी तालुक्यातील काँग्रेस पक्ष टिकवण्यासाठी व समविचारी पक्षांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीस गोकुळचे माजी संचालक पी.डी. धुंदरे, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, भोगावतीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक संजयसिंह पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.या गटाला ए वाय यांनी दुखावलेले बरेच सर्व पक्षीय कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आहे. विद्यमान संचालकांनी मदत करणाऱ्यांना कधीही विश्वासात घेतले नाही.त्यामुळे ही निवडणूक लढवण्यासाठी ठरावधारक व कार्यकर्त्यातून दबाव वाढला आहे.त्यामुळे पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.