दिल्लीत अबकारी घोटाळा ः ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या आणि भारत राष्ट्र समितीच्या आमदार के. कविता यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावला आहे. कविता यांना 9 मार्च रोजी चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. परंतु कविता यांनी गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला आहे. कविता यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी काही मुदत मागितली आहे.
भारत राष्ट्र समितीच्या नेत्याची यापूर्वी 12 डिसेंबर रोजी सीबीआयने 7 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली होती. तर दिल्ली अबकारी घोटाळय़ाप्रकरणी कविता यांचे चार्टर्ड अकौंटंट बुचीबाबू गोरांटला यांना सोमवारीच जामीन मिळाला आहे. सीबीआयच्या पथकाने बुचीबाबू यांना हैदराबाद येथून अटक केली होती.
सीबीआयने सीए बुचीबाबू गोरांटला यांना धोरणनिर्मिती आणि अंमलबजावणीतील कथित भूमिका आणि हैदराबाद येथील घाऊक-किरकोळ मद्यविक्री परवानाधारकांना अवैध लाभ मिळवून दिल्याच्या आरोपाप्रकरणी अटक केली होती. यापूर्वी दिल्लीतील एका न्यायालयाने हैदराबाद येथील व्यावसायिक अरुण रामचंद्र पिल्लई यांना 13 मार्चपर्यंत ईडीची कोठडी आणि मद्यउद्योजक अमनदीप ढल यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या पार्श्वभूमीवर कविता यांना समन्स बजावण्यात आला आहे.
आमने-सामने होणार चौकशी
हैदराबादचे व्यावसायिक अरुण पिल्लई आणि कविता यांची आमने-सामने चौकशी करण्याच्या उद्देशाने ईडीने त्यांना समन्स बजावला असल्याचे समजते. पिल्लई हे ‘साउथ ग्रुप’चे मुख्य सूत्रधार आहेत. पिल्लई यांना ईडीने सोमवारीच अटक केली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्याकडून सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आल्यावर आम आदमी पक्षाच्या सरकारने मागील वर्षी वादग्रस्त अबकारी धोरण मागे घेतले होते. ईडीनुसार ‘साउथ ग्रुप’मध्ये शरद रेड्डी (अरविंदो फार्माचे प्रवर्तक), मगुनना श्रीनिवासुलु रेड्डी (ओंगोल मतदारसंघाचे वायएसआर काँग्रेसचे खासदार), के. कविता आणि अन्य काही जणांचा समावेश आहे.
10 मार्च रोजी जंतर-मंतरवर उपोषण
संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्याच्या मागणीवरून 10 मार्च रोजी जंतर-मंतर येथे एक दिवसीय उपोषण करणार असल्याचे कविता यांनी यापूर्वीच जाहीर पेले आहे. दिल्ली अबकारी घोटाळय़ाप्रकरणी सीबीआयने यापूर्वीच बीआरएस नेत्याची चौकशी केली आहे.
9 नेत्यांच्या पत्राची पार्श्वभूमी
आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनाही दिल्ली अबकारी घोटाळय़ाप्रकरणीच अटक झाली आहे. सिसोदियांवरील कारवाईप्रकरणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून निषेध नोंदविला आहे. ईडी-सीबीआयचा राजकारणासाठी गैरवापर होत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले होते. या पत्रावर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचीही स्वाक्षरी होती. या पार्श्वभूमीवर के. कविता यांची चौकशी होणार आहे. तसेच कविता यांना याप्रकरणी अटक करण्यात आल्यास विरोधी पक्षांच्या नाराजीत अधिकच भर पडणार आहे.









