► वृत्तसंस्था/ हैदराबाद
भारतीय राष्ट्र समिती (बीआरएस) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केसीआर यांना हैदराबादच्या यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर केसीआर 6 ते 8 आठवड्यांत पूर्णपणे बरे होतील, असे डॉक्टरांनी सांगितले होते. यादरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रे•ाr त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते.
केसीआर हे गेल्या गुरुवारी रात्री एर्रावल्ली येथील स्वत:च्या फार्महाऊसमध्ये पाय घसरून पडल्यामुळे जखमी झाले होते. त्यांच्यावर यशोदा रुग्णालयात विशेष दक्षता विभागात वैद्यकीय तज्ञांच्या देखरेखीत शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांना डिस्चार्ज मिळाला असून ते घरी विश्रांती घेत आहेत. लोकांकडून मिळत असलेले समर्थन आणि शुभेच्छा पाहता ते लवकरच बरे होतील. सर्वांच्या प्रेमासाठी आभारी असल्याचे केसीआर यांच्या कन्या के. कविता यांनी म्हटले आहे.









