वृत्तसंस्था / पाटणा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बुधवारी पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यांची भेट घेतली आहे. तिन्ही नेत्यांदरम्यान विरोधी पक्षांची एकजूटता आणि 2024 च्या निवडणुकीतील भूमिकेसंबंधी चर्चा झाल्याचे मानले जात आहे.
राज्यांमुळेच देश तयार होतो. आम्ही आपाआपल्या राज्यांना मजबूत करणार आहोत. बिहार गरीब आणि मागासलेले राज्य आहे. केंद्र सरकारकडून कुठलीच मदत मिळत नसल्याची स्थिती आहे. राज्यांनी परस्परांना मदत करण्याची गरज असल्याचे उद्गार तेजस्वी यादव यांनी काढले आहेत.
केसीआर यांनी गलवान खोऱयात हुतात्मा झालेल्या बिहारच्या वीरपुत्रांच्या कुटुंबीयांना मदतनिधी वितरित केला आहे. याचबरोबर तेलंगणात आग लागून मृत्युमुखी पडलेल्या बिहारच्या 12 कामगारांच्या कुटुंबीयांना त्यांनी आर्थिक मदत प्रदान केली आहे.
भाजपला पराभूत करण्यासाठी दक्षिण आणि उत्तरेदरम्यान एकता या भेटीमुळे निर्माण होणार आहे. केसीआर हे दक्षिणेतील प्रमुख नेते असून भाजप विरोधातील मुख्य चेहरे आहेत. नितीश कुमार यांच्यामध्ये विरोधी पक्षांना आशेचा नवा किरण दिसत आहे. केसीआर अन् नितीश कुमार यांच्या भेटीचा राष्ट्रीय प्रभाव होणे निश्चित असल्याचे उद्गार संजदचे मुख्य प्रवक्ते नीरज कुमार यांनी काढले आहेत.









