कालेश्वरम प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी चौकशी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणात मागील बीआरएस सरकारच्या कार्यकाळात कालेश्वरम सिंचन प्रकल्पातील कथित घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन चौकशीला वेग मिळाला आहे. बुधवारी बीआरएस अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे न्यायालयीन आयोगासमोर हजर राहिले. यादरम्यान बीआरएसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाले होते.
आयोगाने मागील एक वर्षात अनेक इंजिनियर्स आणि अन्य अधिकारी, विशेषकरून सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. यापूर्वी 9 जून रोजी केसीआर यांचे पुतणे आणि बीआरएस आमदार टी. हरीश राव तर 6 जून रोजी भाजप खासदार एटाला राजेंद्र यांची आयोगाने चौकशी केली होती.
भाजप-काँग्रेसचा कट : केटीआर
भाजप आणि काँग्रेसकडून बीआरएस विरोधात कट रचण्यात आला आहे. राहुल गांधी आणि भाजप या कटात सामील आहे. कालेश्वरम प्रकल्पात 100 हून अधिक घटक आहेत. प्रकल्पातील 85 स्तंभांपैकी 2 स्तंभांचे नुकसान झ्घले आहे. काँग्रेसनेच हे कटाच्या अंतर्गत घडवून आणल्याचा संशय आहे. आयोग आणि अन्य राजकीय पक्षांना लवकरच प्रकल्पात कुठलाही घोटाळा झाला नसल्याची जाणीव होईल असा दावा केसीआर यांचे पुत्र केटीआर यांनी केला आहे.









