भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली असून बेंगळुरातील इस्रो संस्थेचे जगभर कौतुक होताना दिसते आहे. इतर देशांकडून भारताची या यशस्वी अभियानासाठी पाठ थोपटली जात आहे. तर दुसरीकडे राज्यात कावेरी पाणी वाटपाचा तंटा पुन्हा घुमू लागला आहे. याप्रश्नी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सर्वपक्षीय नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
भारताचे चांद्रयान-3 यशस्वी झाले आहे. त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या ऐतिहासिक यशाला कारणीभूत ठरलेल्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करण्यासाठी स्वत: पंतप्रधान इस्रोच्या कार्यालयात येणार आहेत. बुधवारी कर्नाटकासह संपूर्ण देशाने चांद्रयानाच्या यशाचा जल्लोष साजरा केला. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर शनिवार दि. 26 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट बेंगळूरला येणार आहेत. दुसरीकडे कावेरीच्या पाण्यावरून तामिळनाडूने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी बुधवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. पावसाअभावी केआरएस धरण भरले नाही. तरीही कर्नाटक सरकार आपल्या वाटणीचे पाणी सोडत नाही, अशी तक्रार करीत तामिळनाडूने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे कर्नाटकाला कायदेशीर लढा लढावा लागणार आहे. याबरोबरच राजकीय आघाडीवरही संघर्ष करावा लागणार आहे.
या मुद्द्यावरून सर्वपक्षीय नेते पंतप्रधानांना भेटणार आहेत. बुधवारच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे. कावेरी खोऱ्यातील शेतकऱ्यांना पंधरा दिवसातून एकदा पाणी पुरविण्याएवढा साठा आपल्याजवळ आहे. अशा परिस्थितीत तामिळनाडूला कुठून पाणी सोडणार? असा प्रश्न कृषीमंत्री चलुवरायस्वामी यांनी उपस्थित केला आहे. तामिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र त्रिसदस्यीय पीठाची रचना केली. त्यामुळे कर्नाटक व तामिळनाडू या दोन राज्यात कावेरीवरून पुन्हा संघर्ष होणार, हे अटळ आहे. या मुद्द्यावर सरकारच्या पाठीशी राहण्याचा निर्णय सर्वपक्षीयांनी घेतला आहे. कावेरी, मेकेदाटू किंवा म्हादई या तिन्ही समस्यांवर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, एच. डी. कुमारस्वामी, जगदीश शेट्टर, वीराप्पा मोईली, सदानंद गौडा, बसवराज बोम्माई आदींसह विविध पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीत भाग घेतला होता. पंतप्रधानांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याचे ठरविण्यात आले आहे.
चांद्रयान मोहिमेचे ऐतिहासिक यश, कावेरी पाणीतंटा आदी प्रमुख विषयांबरोबरच ऑपरेशन रिव्हर्स ऑपरेशनची चर्चाही सुरूच आहे. माजी मंत्री एस. टी. सोमशेखर, शिवराम हेब्बार आदींसह काँग्रेसमधून भाजपवासी झालेले नेते पुन्हा काँग्रेसमध्ये येणार ही चर्चा सुरूच आहे. आपल्या पराभवासाठी भाजपमधील काही नेत्यांनी प्रयत्न केला, असे उघडपणे सांगतानाच या दोन्ही नेत्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यामुळे यशवंतपूरचे आमदार एस. टी. सोमशेखर व यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार यांच्या मतदारसंघातील काही स्थानिक भाजप नेत्यांवर पक्षाने कारवाई केली आहे. एका कारवार जिल्ह्यात 19 भाजप नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जेणेकरून असंतुष्ट नेत्यांची मनातील खदखद कमी करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ही कारवाई सुरू आहे. एस. टी. सोमशेखर यांनी तर विरोधी पक्षाच्या मुख्य प्रतोद पदावर आपली नियुक्ती करण्याची अट ठेवली आहे. जर ते झाले नाही तर ते भाजपला राम राम ठोकणार, हे निश्चित आहे.
माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यासह अनेक नेते पक्षातील फूट टाळण्यासाठी मैदानात उतरले असले तरी सत्तेसमोर कोणाचे शहाणपण चालत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी काँग्रेसला राम राम ठोकल्याचे सांगत सत्तेसाठी भाजपवासी झालेले नेते आता त्याच सत्तेसाठी भाजपला राम राम ठोकून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. याला अनेक कारणे आहेत. आपल्या वारसदारांना उमेदवारी भाजपमधून मिळणार नाही. कारण भाजपमध्ये घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध आहे. काही अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी घराणेशाहीचा विरोधच झाला आहे. अशा परिस्थितीत आमच्या मुलांना राजकारणात कसे आणायचे? हा मोठा प्रश्न या नेत्यांसमोर आहे. अनेक नेत्यांची मुले लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. त्यांना उमेदवारी देताना विजयाचा मापदंड हाच निकष असणार आहे. काँग्रेसलाही 20+ चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजपमधील या असंतुष्ट नेत्यांची गरज आहे. तसेच आपल्या वारसदारांच्या राजकीय भविष्यासाठी या नेत्यांनाही काँग्रेसची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच पक्षांतराच्या चर्चेने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. सध्या एस. टी. सोमशेखर दिल्लीत आहेत. हायकमांडने त्यांच्या मागण्या मान्य केल्या तर त्यांच्या पक्षांतराला विराम मिळणार आहे. त्यांच्या समर्थकांनी मात्र काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले तर समर्थक पुन्हा भाजपमध्ये येणार आहेत. नहून एस. टी. सोमशेखर हेच काँग्रेसवासी होणार आहेत.
सेवा, सत्य, निष्ठा आदी शब्दांना राजकारणात महत्त्व राहिलेले नाही. जनहितापेक्षा स्वहिताला अधिक महत्त्व आहे. त्यामुळेच एखाद्या राजकीय पक्षाने आपल्याकडे दुर्लक्ष केले तर लगेच या नेत्यांचा स्वाभिमान दुखावतो. जनसेवा आणि मतदारसंघाचा विकास या गोंडस नावाखाली पक्षांतर करणार, अशी घोषणा केली जाते. गेल्या आठ-दहा वर्षात कर्नाटकात हाच खेळ पहावयास मिळतो आहे. विकासाच्या बाता कितीही मारल्या तरी शेवटी स्वहित व आपल्या वारसदारांचे हित जपण्यासाठी हे नेते पक्षांतराचा खेळ खेळतात. काँग्रेस-निजदमधून भाजपमध्ये गेलेल्या 17 पैकी अनेक जण नाराज आहेत. कधी एकदा पक्षांतर करून सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसू, याची त्यांना घाई लागली आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत हा खेळ सुरूच राहणार आहे. काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही मूळ कार्यकर्ते व उपरे हा वाद वाढतो आहे. माजी मंत्री बी. सी. पाटील यांनी तर माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वराप्पा यांच्यावर उघड उघड निशाणा साधला आहे. हायकमांडने मात्र अद्याप यामध्ये थेट हस्तक्षेप केला नाही. पावसाअभावी राज्यातील 120 हून अधिक तालुके दुष्काळग्रस्त बनले आहेत. अनेक ठिकाणी पेरणीनंतर पिके सुकू लागली आहेत.








