पंतप्रधान मोदींच्या सूचनेचे त्वरित क्रियान्वयन, काही भारतीय पोहोचले जेद्दाह येथे
नवी दिल्ली, खार्तूम / वृत्तसंस्था
गृहयुद्धग्रस्त सुदान देशात अडकलेल्या 3,000 हून अधिक भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी ‘कावेरी अभियाना’चा प्रारंभ करण्यात आला आहे. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांची सुटका करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आता कार्यवाही केली जात आहे.
सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी अनेक विमाने आणि नौका सज्ज करण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांची सुटका करण्याची योजना आहे. हे अभियान त्वरेने पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल. सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी कोणतीही चिंता कऊ नये. केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात आली आहेत. भारतीय सेनादलांचे साहाय्य घेण्यात येणार आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर यांनी दिली.
सुपर हर्क्युलस विमाने
नागरिकांच्या सुटकेसाठी भूदलाची सुपर हर्क्युलस वाहतूक विमाने वापरली जाणार आहेत. अफगाणिस्तानातून भारतीयांची सुटका करण्यासाठी सी-130 जे विमानांचा उपयोग करण्यात आला होता. भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि सुटका यासाठी सर्व उपाय केले जाणार आहेत. अनेक देशांच्या प्रशासनांशी आम्ही संपर्क करत असून त्यांचेही साहाय्य घेण्यात येत आहे. सुदानच्या प्रशासनाशीही संपर्क करण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जेद्दाह येथे काही जणांचे आगमन
कावेरी अभियानाचा प्रारंभ झाल्यानंतर काही तासातच काही नागरिकांची सुटका करण्यात आली असून ते जेद्दाह या देशात सुखरुप पोहचले आहेत. सुटका झाल्यामुळे या नागरिकांना आनंद व्यक्त केला. आणखी 500 नागरिक सुदानची राजधानी खार्तूमच्या विमानतळावर पोहचले आहेत. त्यांची सुटका लवकरच केली जात आहे. शनिवारी सौदी अरेबियाने तीन भारतीयांची सुटका केली आहे. तसेच, सोमवारी फ्रान्सच्या वायुदलाने 5 भारतीयांची सुटका केली आहे.
जमिनीवरील स्थितीवर अवलंबून
सुटका अभियान तेथील प्रत्यक्ष स्थितीवर अवलंबून आहे. अडकलेल्या नागरिकांना जमिनीवरुन विमानतळापर्यंत किंवा बंदरापर्यंत नेण्यात धोका आहे. तरीही स्थानिक प्रशासनाशी संपर्क करुन धोका कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तातडीची उपाययोजनाही सज्ज आहे. तसेच पर्यायी मार्गही विचाराधीन आहेत. सुदानमधली स्थिती गंभीर आहे, असे परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले.
दुतावासाचा सातत्याने संपर्क
खार्तूम येथील भारतीय दुतावास तेथे अडकलेल्या नागरिकांच्या सातत्याने संपर्कात आहे. त्यांची अडीअडचणी समजून घेतल्या जात आहेत. शक्य तितके साहाय्य त्यांना मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. भारतीय नागरिकांना अनावश्यक प्रवास किंवा स्थानांतर टाळण्याची सूचना करण्यात आली आहे. परिस्थिती थोडी निवळल्यानंतर नागरिकांच्या हालचाली सुलभतेने होऊ शकतील, अशी माहिती सुदानमधील भारतीय दुतावासाकडून देण्यात आली.
गृहयुद्धात 424 लोकांचा मृत्यू
आतापर्यंत सुदानमधील गृहयुद्धात 424 लोकांचा मृत्यू झाला असून 3,730 लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका भारतीयाचा समावेश आहे. हे गृहयुद्ध 15 एप्रिलपासून सुऊ असून अद्यापही सामोपचाराचे प्रयत्न यशस्वी ठरलेले नाहीत. सुदानची सरकारी सेना आणि तेथील खासगी सेना यांच्यात हे युद्ध होत आहे.
भारताची योजना सज्ज
ड नागरिकांच्या सुटकेसाठी भारताची व्यापक योजना आणि साधने सज्ज
ड कावेरी अभियान जोमाने आणि त्वरेने क्रियान्वित करण्यासाठी सूचना
ड सुदानमधील तीन हजारांहून अधिक भारतीयांशी केला जात आहे संपर्क









