सोन्याच्या दागिन्यांच्या फसवणुकीत ५ आरोपी अटक
कवठेमहांकाळ : महिलेला फसवून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला कवठेमहांकाळ पोलिसांनी जेरबंद केले. फसवणुकीच्या प्रकरणात ५ आरोपींना ताब्यात घेऊन चोरीचे सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला.
२८ ऑक्टोबर रोजी, सुमारे ११.३० ते १२.०० च्या दरम्यान अनुसया मारुती दुधाळ (वय ६०, व्यवसाय घरकाम) या कृष्णा ज्वेलर्सकडून चांदीचे दागिने घेऊन जात असताना, दोन अनोळखी व्यक्तींनी बनावट सोन्याची बिस्किटे दाखवण्याचा बहाणा करून ३० ग्रॅमची सोन्याची साखळी किं २,१०,००० व १० ग्रॅमची ३५ मणी असलेली बोरमाळ किंमत ७०,००० रुपये एकूण किंमत २,८०,००० रुपये या टोळीने लंपास केले होते.
पोलीसांनी घटनास्थळी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, चारचाकी वाहनाची नोंदणी क्र एम.एच. ०४ डीआर ६६७९) आणि मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. कारवाई करून आरोपींना गाडीसह ताब्यात घेतले. ३१ ऑक्टोबर रोजी आरोपी विठ्ठल ग्यानबा जाधव, मनोहर श्रीमंत गायकवाड, धोंडीराम केरबा गायकवाड, बाळासाहेब युवराज गायकवाड, युबराज दादाराव गायकवाड, (सर्व रा. सलगरा बुद्रुक, ता. लातूर, जि. लातूर) यांना अटक केली.
अटक केलेल्या आरोपींनी गुन्हा कबूल केला आणि सांगितले की, त्यांनी कवठेमहांकाळ येथील एका व्यक्तीकडून फसवणुकीद्वारे दागिने मिळविले. तसेच नातेपुते पोलीस ठाणे व माळशिरस पोलीस ठाणे यांच्याकडील आधीच्या फसवणुकीतील बोरमाळ व शॉर्ट गंठणही त्यांनी मिळविल्या असल्याचे कबूल केले.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे, उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस संजय कांबळे, पोलीस नागेश मासाळ, पोलीस श्रीमंत करे, पोलीस शितल जाधव, पोलीस अभिजीत कासार यांनी आरोपींविरोधात कारवाई करून मुद्देमाल ताब्यात घेतला.








