सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : केंद्र सरकारकडून कस्तुरीरंगन अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या अहवालाची अंमलबजावणी करू देणार नाही. सदर अहवाल परत पाठवू याला विरोध असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि वनमंत्री ईश्वर खंड्रे यांच्याशी चर्चा करू, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. शिरसी येथे वनभूमी हक्क आंदोलन वेदिकेकडून कस्तुरीरंगन अहवालाविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीला संबोधन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, वनसंरक्षण व्हावे याची आवश्यकता आहे. मात्र यामुळे नागरिकांनाही त्रास होऊ नये, या दृष्टीने त्याची कार्यवाही व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वनसंरक्षण करण्यामध्ये वनखात्याचे पात्र मोठे आहे. त्याबरोबरच वनक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांचेही तितकेच महत्त्वाचे पात्र आहे. यासाठी वन प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांवर अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन जारकीहोळी यांनी दिले. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष कागोडू तिम्मप्पा, आंदोलन वेदिकेचे अध्यक्ष रविंद्र नायक, भीमण्णा नायक, सतीश सैल यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.









