जम्मू-श्रीनगर महामार्गावर हजारो वाहने अडकली
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शनिवारी जम्मू-काश्मीर विभागात दरड कोसळल्याने अनेक रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले होते. रामबनच्या मेहर आणि कॅफेटेरिया वळणावर दरड कोसळल्याने जम्मू-श्रीनगर महामार्ग ठप्प झाला आहे. यामुळे हजारो वाहने अडकून पडली. शनिवारी सकाळी झालेल्या दमदार पावसाचा फटका अमरनाथ यात्रेलाही बसला आहे. विविध भागात प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले आहे. तसेच वैष्णोदेवी डोंगरावर धुक्मयामुळे विमानसेवा पूर्ववत होऊ शकली नाही.
संततधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी बंद असलेला राष्ट्रीय महामार्ग गुरुवारी दुपारी खुला झाला. दरम्यान, पोलिसांनी अडकलेली वाहने जम्मू आणि खोऱयाच्या दिशेने पाठवली होती. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वाहने जात असताना रामबन येथील डोंगरावरून अचानक दरड पडण्यास सुरुवात झाली आणि महामार्ग पुन्हा बंद झाला. शुक्रवारी सकाळी दरड हटवून महामार्ग खुला करण्यात यश आले. महामार्ग उघडल्यानंतर पोलिसांनी मध्यभागी अडकलेल्या वाहनांना प्रथम घाटी आणि जम्मूच्या दिशेने पाठवले. यानंतर उधमपूरमध्ये थांबलेली वाहने घाटीच्या दिशेने रवाना करण्यात आली. उधमपूर येथे दुपारी चार वाजता थांबलेल्या ट्रकनाही घाटीच्या दिशेने जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. शनिवारी महामार्गावर पुन्हा काही ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती.
अमरनाथ भाविकांची तुकडी रोखली
जम्मूच्या भगवती नगर बेस कॅम्पमधून अमरनाथ यात्रेकरूंच्या एका गटाला भूस्खलन आणि डोंगरांवरून दगड पडल्यामुळे सुरक्षितता लक्षात घेऊन काश्मीरला पाठवण्यात आले नाही. सुमारे 2000 यात्रेकरूंना बेस कॅम्प भगवती नगर, जम्मू येथे सामावून घेण्यात आले आहे. मात्र, रामबन येथील चंद्रकोट यात्री निवास येथे अडकलेल्या तुकडय़ा संध्याकाळपर्यंत संबंधित बेस कॅम्पवर पोहोचल्या होत्या. अमरनाथ यात्रा पारंपरिक बालटाल आणि पहलगाम मार्गाने सुरू असते. हवामानाचे आव्हान असतानाही देशभरातून दररोज हजारो शिवभक्त जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचत आहेत.
चिनाब नदीकाठावर दक्षतेचा इशारा
वाढत्या पावसामुळे चिनाब नदीजवळ न जाण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे. दुलहस्ती पॉवर स्टेशन, एनएचपीसी लिमिटेडच्या व्यवस्थापनाने प्रामुख्याने दुल, बोंजवाड, चिरार, भांडारकोट, हस्ती, कांडणी, प्रेमनगर, पुल दोडा आदी गावांतील नागरिकांना चिनाब नदीच्या काठावर न जाण्याचा इशारा दिला आहे. दुलहस्ती पॉवर स्टेशन धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे चिनाब नदीच्या सखल भागातील पाण्याची पातळी 2 ते 3 मीटरने वाढू शकते. त्यामुळेच लोकांना सतर्क करण्यात आले आहे.









