केएफएफ दहशतवादी संघटनेचे कृत्य, शेतात जात असताना केला गोळीबार
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिह्यात शनिवारी एका काश्मिरी पंडितावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात तो गंभीर जखमी झाला. पूरण कृष्ण भट असे हत्या झालेल्याचे नाव असून त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. जम्मूमध्ये लोक रस्त्यावर उतरले असून या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत. आंदोलक न्यायाची मागणी करत आहेत. या निदर्शनात महिलांसह मोठय़ा संख्येने लोक उतरल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा यांनी काश्मिरी पंडिताच्या हत्येचा निषेध केला आहे.
शोपियान जिह्यात एका काश्मिरी पंडिताची शनिवारी दहशतवाद्यांनी गोळय़ा झाडून हत्या केली. पूरण कृष्ण यांच्यावर दक्षिण काश्मीर जिह्यातील चौधरी गुंड भागातील त्यांच्या घराजवळ हल्ला करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. पूरण कृष्ण भट हे आपल्या घरापासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या बागेच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. सकाळी 11 वाजता ते घराजवळील मळय़ात कामासाठी जात होते. गोळीबारानंतर तत्काळ रुग्णालयात नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर लगेचच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरू केली. दहशतवाद्यांनी यावषी 12 हून अधिक नागरिकांची टार्गेट किलिंगच्या माध्यमातून हत्या केली आहे. मृतांमध्ये बहुतांश गैर-स्थानिक, काश्मिरी पंडित आणि पंचायत सदस्यांचा समावेश आहे.
‘केएफएफ’ने स्विकारली जबाबदारी
केएफएफ या दहशतवादी संघटनेने पूरण कृष्ण भट यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारल्याचे दक्षिण काश्मीरचे डीआयजी सुजित कुमार यांनी सांगितले. घटनेच्या वेळी एक पोलीस त्या भागात सेवेत होता. सुरक्षा रक्षक किंवा त्या भागातील कोणत्याही अधिकाऱयाकडून सुरक्षेत त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. कुटुंबीयांच्या विनंतीवरून मृतदेह अंतिम संस्कारासाठी जम्मूला पाठवण्यात येणार आहे, असेही ते पुढे म्हणाले.









