24 मतदारसंघात उद्या होणार मतदान
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी समाप्त झाला. आता बुधवार, 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात 24 जागांसाठी मतदान होणार आहे. त्याआधी निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणांनीही मतदानाबाबत दक्षता वाढवली आहे. पहिल्या टप्प्यात दोडा, किश्तवाड आणि रामबन जिल्ह्यातील आठ विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. दहशतवादी हल्ल्यांचा धोका असलेल्या या जिल्ह्यांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर आणि पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमांतर्गत येथे 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण 280 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या विधानसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत त्यामध्ये काश्मीर खोऱ्यातील पंपोर, त्राल, पुलवामा, राजपोरा, जैनापोरा, शोपियान, डीएच पोरा, कुलगाम, देवसर, डोरू, कोकरनाग, अनंतनाग पश्चिम, अनंतनाग, श्रीगुफ्वारा या मुख्य मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच जम्मू प्रदेशातील इंदरवाल, किश्तवाड, पदर-नागसेनी, भदेरवाह, दोडा, दोडा पश्चिम, रामबन आणि बनिहालमध्ये निवडणुका होणार आहेत.
राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षासह सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. दरम्यान, सोमवारी, जम्मू-काश्मीरमधील पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी चिनाब खोऱ्यात तीन सभांना संबोधित केले.









