यंदा एकदाही घडला नाही प्रकार : फुटिरवाद्यांच्या मुसक्या आवळल्याने मिळाले यश
वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीर खोऱ्यात 2008 पासून पाकिस्तानच्या निर्देशानुसार होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांवर 2020 पासून आळा बसू लागला आहे. आकडेवारीनुसार 2022 मध्ये काश्मीर खोऱ्यात दगडफेकीच्या केवळ 5 घटना घडल्या आहेत. तर चालू वर्षात आतापर्यंत काश्मीरमध्ये दगडफेकीची एकही घटना घडलेली नाही असा दावा पोलिसांनी केला आहे.
आयबीच्या एका अहवालानुसार पाकिस्तानच्या आयएसआयने काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना 2009 नंतरपासून 800 कोटी रुपयांहून अधिक रक्कम पुरविली होती. पाकिस्तानकडून पैसे मिळत असल्यानेच 2016 मध्ये श्रीनगरमध्ये ‘पत्थरबाज असोसिएशन ऑफ जे अँड के’ यासारख्या संघटना उदयास आल्या होत्या.
काश्मीर खोऱ्यात दगडफेक हा एक उद्योगच ठरला होता. दगडफेक करण्यासाठी दहशतवादी, हँडलर्स, हवाला नेटवर्क आणि अन्य माध्यमांद्वारे पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यात पैसा पाठविला जात होता. यानंतर फुटिरवादी नेते तसेच ओव्हरग्राउंड वर्कर्सच्या नेटवर्कद्वारे दगडफेक करणाऱ्या युवकांमध्ये हा पैसा वाटला जात होता.
आता होतोय पश्चाताप
वयाच्या 16 व्या वर्षी दगडफेक केल्याने समस्या सुटतील असे मला वाटत होते. परंतु पोलीस आणि न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्यावर वस्तुस्थितीची मला जाणीव झाली. दगडफेक केल्याने माझेच नुकसान झाले. परंतु आता हा मार्ग मी सोडून दिला असल्याचे आदिल फारुकने सांगितले आहे.
हजार रुपये मिळायचे
आर्थिक हलाखीच्या स्थितीत एका एजंटने मला दगडफेक करण्यासाठी प्रवृत्त केले. माझ्या हातावर त्याने हजार रुपये ठेवले हेते. दुसऱ्या दिवशी कुठे दगडफेक करायची हे आम्हाला सांगितले जात होते. दगडफेक करणे हेच माझे काम ठरले होते, परंतु त्याचा पुढील काळात मोठा त्रास झाल्याचे अबरार भटचे सांगणे आहे.
दगडफेक रोखण्यास मिळाले यश
1 एनआयए, पोलीस, अन्य यंत्रणांचे दगडफेकीबद्दल झिरो टॉलरन्सचे धोरण
2 सरकारच्या वित्तीय यंत्रणांनी हवाला, विदेशातून वित्तसहाय्य रोखले
3 युवकांना धार्मिक कट्टरवादापासून दूर करण्यासाठी डी-रॅडिकलायजेशन कार्यक्रम
4 दगडफेक करणाऱ्यांना अन्य राज्यांच्या तुरुंगात हलविण्यात आले









