राहुल गांधींचे वादग्रस्त विधान, चीनचेही केले कौतुक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंब्रिज विद्यापीठात काँगेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. भारतातील जम्मू-काश्मीर हे हिंसक स्थान आहे असे विधान त्यांनी केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच त्यांनी चीनचेही अनाठायी कौतुक केल्याने सोशल मिडियावर त्यांची चांगलीच खरडपट्टी निघत आहे. त्यांच्या विधानांचा अर्थ स्पष्ट करताना काँगेस प्रवक्त्यांची नेहमी प्रमाणेच त्रेधातिरपिट होत असून त्यांची विधाने हा चर्चेचा विषय बनला आहे.
चीन हा देश नैसर्गिकतेशी जोडला गेला आहे. तेथील पायाभूत सुविधा, रेल्वे, विमानतळ, बंदरे आदी आस्थापने निसर्गाशी जुळवून घेऊन निर्माण करण्यात आली आहेत. मात्र, अमेरिका स्वतःला निसर्गापेक्षा श्रेष्ठ मानतो. त्यामुळे तो निसर्गाची हानी करतो. निसर्गाशी जोडला गेल्यानेच चीन शांततावादी आहे. ‘शांती’ मध्ये त्याला अतिशय स्वारस्य आहे, असेही आश्चर्यकारक विधान त्यांनी केले.
टीकेचा भडिमार
राहुल गांधींच्या दृष्टीने शांतीप्रिय असणाऱया चीननेच भारतावर 1962 मध्ये आक्रमण केले होते. तसेच त्याच्या नंतर आणि आधीही चीनने अनेकदा भारतीय सीमेवर शांततेचा भंग करणाऱया कृती केल्या आहेत. अलिकडच्या काळात गलवान येथे चीनने केलेला भारतीय सैनिकांवरचा हिंसक हल्ला हे चीनच्या शांतीप्रियतेचे उदाहरण मानयचे काय असा प्रश्न राहुल गांधीना सोशल मिडियावरुन विचारण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षानेही त्यांच्या चीन आणि काश्मीरसंबंधीच्या विधानांवर हल्लाबोल केला असून दाशाचा अपमान केल्याची टीका केली आहे. त्यांच्या अशा संतापजनक विधानांची देश गंभीर दखल घेईल आणि अशा विधानांमुळे काँगेसचीच हानी होणार, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
आणखीही आश्चर्यकारक विधाने
चीन सरकार एका कॉर्पोरेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे त्याची देशातल्या प्रत्येक हालचालीवर घट्ट पकड असते. अशी स्थिती भारत आणि अमेरिकेत नाही. आणि चीनच्या याच कार्यपद्धतीमुळे चीन ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’च्या संदर्भात जगात आघाडीवर आहे, असाही अजब दावा राहुल गांधींनी केला आहे.
माझ्या फोनमध्ये पेगॅसस
भारतात लोकशाहीची यंत्रणा मोडून काढण्याचे प्रयत्न होत आहेत. पंतप्रधान मोदी भारताचा लोकतांत्रिक पाया नष्ट करीत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हेरगिरी करण्यात येत आहे. माझ्या आणि अन्य विरोधीं पक्षनेत्यांच्या फोनमध्ये पेगॅसस हे सॉफ्टवेअर घुसविण्यात आले होते. ही माहिती मला गुप्तचर विभागाच्या काही अधिकाऱयांनीच दिली, असेही अनेक खळबळजनक दावे राहुल गांधींनी केले. पेगॅसस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चौकशी समिती स्थापन केली होती. मात्र या समितीला पेगासिचा कोणताही पुरावा सापडला नव्हता. त्यामुळे अखेर केंद्र सरकारला क्लिनचिट मिळली होती. ही सत्यपरिस्थिती असताना राहुल गांधी असा दावा कसा करु शकतात, हा प्रश्न विचारण्यात येत असून चौकशी समितीकडे राहुल गांधींनी तक्रार का केली नाही आणि मोबाईल तपासणी का केली नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात येत आहे.
काश्मीरसंबंधी वादग्रस्त विधान
काश्मीर हिंसक जागा आहे असे विधान त्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यासंबंधात बोलताना केले, काश्मीर घुसखोरीप्रवण आणि फुटीरताप्रवण स्थान आहे अशीही भाषा राहुल गांधी यांनी केली. सोशल मिडियावर या विधानांचा खरपूस समाचार घेतला जात आहे. त्यांची विधाने अनाकलनीय असून त्यांचा अर्थ लावणेही कित्येकदा कठीण जाते, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.









