श्रीनगर / वृत्तसंस्था
लष्करे तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा भागात खात्मा करण्यात आला आहे. शोपियानमध्येही सैनिकांनी दहशतवाद्यांना घेरले असून तेथे गोळीबार मंगळवारी रात्री उशीरापर्यंत सुरु होता. त्यात एक दहशतवादी मारला गेल्याची माहिती देण्यात आली आहे. कुपवाडा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावरुन भारतीय सेनेच्या एका तुकडीने या भागाला घेरले. त्यावेळी दहशतवाद्यांनी कोंडी फोडण्यासाठी गोळीबार सुरु केला. सैनिकांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात 2 दहशतवादी ठार झाले. त्यांच्यापैकी एक पाकिस्तानचा नागरीक असल्याची माहिती देण्यात आली.
एका अन्य घटनेत पाकिस्तानने भारताच्या कक्षेत सोडलेल्या एका ड्रोनवर सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी गोळीबार केला. नंतर हे ड्रोन पाकिस्तानमध्ये परत गेल्या दिसून आले. सैनिकांनी सीमेवरही गोळीबाराच्या दोन फैरी झाडल्या. सीमा सुरक्षा दलाने सीमेवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
जम्मूत तीन स्फोटके हस्तगत
पाकिस्तानच्या ड्रोनमधून टाकण्यात आलेली तीन चुंबकीय स्फोटके आणि टायमर्स जम्मूच्या सीमावर्ती भागात हस्तगत करण्यात आली आहेत. हे स्फोटके जेवणाच्या डब्यातून टाकण्यात आली होती. त्यांना निकामी करण्यात आले आहे. पाकिस्तानी ड्रोनचा सुगावा लागताच सीमा सुरक्षा दलाने सीमवरील गस्त वाढविली असून स्फोटके शोधली जात आहेत. आणखी स्फोटके टाकली असल्याची शक्यता आहे. या स्फोटकांचा उपयोग अमरनाथ यात्रेत हिंसाचार घडविण्यासाठी केला जाणार होता, अशी माहिती गुप्तचरांना मिळाली असल्याचे सांगण्यात आले.
सीमवरील गस्त वाढविली
पाकिस्तानकडून दहशतवादी भारताच्या भागात घुसविण्याच्या घटना वाढल्याने सीमेवर गस्त वाढविण्यात आली आहे. ड्रोनच्या माध्यमातून स्फोटकांची तस्करी भारतात करण्याचा नवा मार्ग पाकिस्तानने शोधल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसून आले आहे. मात्र, आतापर्यंत असे अनेक प्रयत्न हाणून पाडण्यात आले असून सीमेवर डोळय़ांत तेल घालून लक्ष ठेवण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.









