वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘काशी तमिळ संगमम 3.0’ची घोषणा करत हे आयोजन 15-24 फेब्रुवारीपर्यंत होणार असल्याची माहिती दिली आहे. काशी तमिळ संगममसाठी रजिस्ट्रेशन वेबसाइट लाँच करण्यात आली आहे. यावेळी संगममचे तिसरे आयोजन जगातील सर्वात मोठा धार्मिक-अध्यात्मिक महाकुंभ मेळ्याच्या कालावधीत होणार आहे. काशी तमिळ संगमममध्ये भाग घेणाऱ्या प्रतिनिधींना महाकुंभ मेळ्यादरम्यान अमृत स्नान आणि पवित्र स्नान करण्याची संधी मिळणार आहे. तसेच तामिळनाडू येथून येणारे विद्यार्थी तसेच शिक्षक अयोध्येत राम मंदिराचे दर्शनही करणार आहेत. श्रीराम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरचे हे पहिले काशी तमिळ संगमम असल्याचे प्रधान यांनी सांगितले आहे.
तामिळनाडूतून येणारे विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, कारागिर, तंत्रज्ञ आणि छोट्या उद्योजकांसोबत महिला आणि संशोधकही काशीच्या नमो घाटावर आयोजित होणाऱ्या या मोठ्या कार्यक्रमात सामील होतील. तसेच त्यांना प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या संगम काठावर महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्राचीन काळापासून शिक्षण आणि संस्कृतीची ही दोन महत्त्वपूर्ण केंद्रं राहिली असून दोघांदरम्यान अतूट सांस्कृतिक संबंध राहिला असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. या संगममचा उद्देश याविषयी युवांना जागरुक करणे असून याद्वारे विविध क्षेत्रांमध्ये लोकांदरम्यान परसपर संपर्क-संवाद वाढविला जाईल. तामिळनाडू आणि काशीदरम्यान हे अतूट बंधन काशी तमिळ संगममच्या माध्यमातून आणखी मजबूत होतेय. काशी तमिळ संगममची मुख्य थीम ऋषी अगस्त्य यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाला उजाळा देणे असल्याचे प्रधान यांनी सांगितले.
5 विशेष श्रेणी
या आयोजनात भाग घेण्यासाठी संबंधित पोर्टलवर 5 श्रेणींमध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत. तामिळनाडूतून 1 हजार जण यात सहभागी होतील. याचबरोबर सर्व केंद्रीय विद्यापीठांमधून 200 तमिळ विद्यार्थ्यांचा एक समूह यात असेल. त्यांना वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्येचा स्थानिक प्रवास करण्याची संधी मिळेल. 5 फेब्रुवारीला या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांची यादी जारी केली जाईल.









