भारतीय वंशाच्या नागरिकाला अमेरिकेत मोठी जबाबदारी : सिनेटची मंजुरी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारतीय वंशाचे काश पटेल हे अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयचे संचालक झाले आहेत. अमेरिकेच्या संसदेतील वरिष्ठ सभागृहाने त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. काश पटेल यांच्या नियुक्तीसंबंधी झालेल्या मतदानात त्यांची 51 विरुद्ध 49 अशा किंचित बहुमताने पदासाठी निवड झाली आहे.
डेमोक्रेटिक पार्टीच्या खासदारांसोबत पटेल यांच्या विरोधात रिपब्लिकन खासदार सुसान कॉलिन्स आणि लिसा मर्कोव्स्की दोमात्र यांनी मतदान केले आहे. काश पटेल हे एफबीआय संचालक पद सांभाळल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशांचे पालन करतील आणि ट्रम्प विरोधकांना लक्ष्य करतील अशी भीती डेमोक्रेटिक पार्टीच्या खासदारांना वाटत आहे. तर सिनेटकडून नियुक्तीला मंजुरी मिळाल्यावर पटेल यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अॅटर्नी जनरल पाम बॉन्डी यांच्या समर्थनासाठी त्यांचे आभार मानले आहेत.
पटेल यांचा इशारा
सिनेटच्या मंजुरीनंतर पटेल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. एफबीआय अमेरिकन नागरिकांना नुकसान पोहोचविणाऱ्यांचा या ग्रहाच्या प्रत्येक कोपऱ्यात पाठलाग करणार असल्याचा इशारा त्यांनी याद्वारे दिला आहे. एफबीआयच्या जी-मेनपासून 9/11 हल्ल्यानंतर आमच्या देशाच्या सुरक्षेपर्यंत एक आकर्षक वारसा आहे. अमेरिकन नागरिक अशा एफबीआयसाठी पात्र आहेत, जे पारदर्शक, उत्तरदायी आणि न्यायासाठी प्रतिबद्ध असेल. आमच्या न्याय प्रणालीच्या राजकीयकरणामुळे जनतेचा विश्वास संपुष्टात आला आहे. लोकांना गर्व वाटेल असे स्वरुप एफबीआयला मिळवून देऊ असे काश पटेल यांनी म्हटले आहे.
गुजराती कुटुंबात जनम
काश पटेल हे भारतीय स्थलांतरितांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म एका गुजराती कुटुंबात झाला होता. काश पटेल यांचे आईवडिल युगांडाचे हुकुमशहा ईदी अमीनच्या देश सोडण्याच्या फर्मानामुळे घाबरून 1970 च्या दशकात कॅनडामार्गे अमेरिकेत पोहोचले होते. 1988 मध्ये पटेल यांच्या पित्याला अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले होते. तर काश पटेल यांनी 2004 मध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर सरकारी वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. काश पटेल हे 2013 साली वॉशिंग्टनमध्ये न्याय विभागात सामील झाले. 2016 मध्ये त्यांना गुप्तचर विषयक स्थायी समितीत कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या विभागाचे प्रमुख डेव्हिड नून्स होते, जे ट्रम्प यांचे निकटवर्तीय होते. त्यानंतर काश पटेल हे ट्रम्प यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाऊ लागले होते.









