प्रतिनिधी/ कराड
राज्याचे लक्ष लागून राहिलेली कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी केली आहे. महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून यासाठी मोठी प्रचार यंत्रणा काम करताना दिसत आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत केली असून युवक काँग्रेस उमेदवारा सोबत प्रचार करणार आहे.
शिवराज मोरे यांच्या समितीमध्ये दीपाली ससाणे (प्रदेश महासचिव), अक्षय जैन (प्रदेश महासचिव), प्रथमेश अबनावे (प्रदेश महासचिव), राहुल शिरसाट (पुणे शहर अध्यक्ष), ऋषिकेश वीरकर (कसबा पेठ विधानसभा अध्यक्ष) आदी सदस्य असणार आहेत.
युवक काँग्रेसच्या समितीने कसबा पेठ मतदार संघात बुथ कमिटीप्रमाणे नियोजन केले असून घर टू घर प्रचारावर भर दिला आहे. तसेच कोपरा सभा, रॅली यांचे नेटके नियोजन केलेले असून सोशल मीडियाचे बुथ प्रमाणे ग्रुप करून प्रचार केला जात आहे. तसेच पदयात्रा व जाहीर सभा यांचे उमेदवारांसोबत प्रत्यक्ष नियोजन केले आहे. स्वतः उमेदवार रवींद्र धंगेकर हे आपल्या यंत्रणेमार्फत प्रचार करीत आहेत. यामुळे प्रचाराच्या महाविकास आघाडीच्या या रणनितीने काँग्रेसने नक्कीच आघाडी घेतली असून रवींद्र धंगेकर निवडून येतील, असा विश्वास शिवराज मोरे यांनी व्यक्त केला.









