विश्वनाथ मोरे कसबा बीड/ प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कसबा बीड महादेव मंदिर व सातेरी महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी झाली. येथे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी अलोट गर्दी केल्याने डोंगर परिसर गर्दीने फुलला होता. पंचक्रोशीतील कोगे, महे, कसबा बीड,गणेशवाडी, सावरवाडी, शिरोली दुमाला व बारा वाड्या या गावातील भाविकांनी चालत, मोटरसायकल यांच्या माध्यमाने प्रचंड गर्दी केली होती.
सातेरी महादेव डोंगरावर ‘ हर हर महादेव’ चा गजर घुमत होता. पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी यायला सुरुवात झाली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत होते. मोठा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळत होता.डोंगरावर रस्त्याच्या बाजूला पूजेचे साहित्य तसेच खाऊपासून ते विविध प्रकारची खेळणी, वस्तूंची थाटलेली लहान दुकाने आणि भाविकांच्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप आले होते. सायंकाळपर्यंत दर्शनासाठी भाविकांची ये-जा सुरु होती.
बाराव्या शतकात प्राचीन ऐतिहासिक महत्व जपणाऱ्या करवीर तालुक्यातील सातेरी महादेव निसर्ग रम्य परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती .कसबा बीड व सातेरी महादेव मंदिर येथे ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. भाविक भक्तांसाठी मोफत टू व्हीलर व फोर व्हीलर रस्त्यावर वर्कशॉप्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याशिवाय अनेक तरुण मंडळांनी ठिकाणी ठिकाणी मोफत सरबत व पाणी याचबरोबर उपवासाची खिचडी व केळी वाटपही सुरू होते. सातेरी महादेव मंदिर शेजारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करवीर पोलिस स्टेशन कोल्हापूर यांच्याकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .
Previous Articleनिवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे आंदोलन
Next Article आमदार योगेश कदम यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव









