अखिल गोमंतक त्वष्टा कासार समाज संस्थेतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन सादर
वाळपई : राज्यातील कासार समाजाला ओबीसी दर्जा द्यावा व त्यांना आरक्षण देण्याच्या विषयाला चालना देऊन सदर मागणी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करावा,अशा मागणीचे निवेदन अखिल गोमंतक त्वष्टा कासार समाज संस्थेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले आहे.त्वष्टा कासार समाज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने संस्थेच्यावतीने गेल्या नऊ वर्षांपासून ओबीसी दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष महेश तांबट यांनी दिली.राज्यात कासार समाजाची लोकसंख्या दोन ते अडीच हजारांच्या आसपास आहे. समाजातील बहुसंख्य लोक अजूनही मागास आहेत. यामुळे समाजावर फार मोठा अन्याय झाला आहे.
त्यासाठी राज्यातील ज्ञाती बांधवांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या अखिल गोमंतक त्वष्टा कासार समाज संस्थेच्यावतीने सन 2015 साली, गोवा राज्य ओबीसी व अनुसूचित जाती आयोगाकडे त्वष्टा कासार समाजाला ओबीसीचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली होती परंतु सदर मागणी अद्याप प्रलंबित असल्याचे महेश तांबट यांनी सांगितले.निवेदन सादर केल्यानंतर आयोगाच्या निर्देशानुसार संस्थेच्यावतीने राज्यातील कासार समाजाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यात आला परंतु सदर विषयावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सरकारने यापुढे वेळ न काढता त्वरित या विषयाला चालना देऊन कासार समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती महेश तांबट यांनी दिली. या शिष्टमंडळात संस्थेचे सचिव दिवाकर सावंत, सदस्य अॅड. महेंद्र एकावडे होते.