हुल्लडबाजांना पोलिसांच्या दंडुक्याची भीतीच राहिली नाही असे वातावरण
कास : मे महिन्यातच पावसाने कास परिसरातील पावसाळी पर्यटनला रंग भरल्याने पर्यटकांची पावले कास परिसराकडे वळू लागली आहेत. मात्र पर्यटनाच्या नावाखाली दुल्लडबाज पर्यटकांची बेबंदशाही दिवसेंदिवस वाढू लागल्याने या रोडवरील अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे अनेकांचे नाहक बळी जाऊन वादावादीच्या कटकटीला समोरे जावे लागत आहे. मात्र पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष म्हणायचे की हुल्लडबाजांना पोलिसांच्या दंडुक्याची भीतीच राहिली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
निसर्गसौंदर्यांनी नटलेला भर उन्हाळ्यातही गारव्याचा शांततेचा आनंद देणारा कास परिसर पूर्वीपासूनच शांत पाहायला मिळतो. मात्र अलिकडे पर्यटनाच्या नावाखाली काही हुल्लडबाज परिसरात येऊन निसर्ग सौंदर्यासोबतच येथील शांततेला गालबोट लावताना दिसत असून रस्त्यातच गाड्या लावून मद्यप्राशन करून गाण्यांच्या तालावर डान्स करत वाहतुकीस अडथळा करून प्रवाशांना त्रास देणे, गाड्यांच्या टपावर बोनेटवर बाटल्या ठेवून मद्यप्राशन करण्याचा सर्रास
प्रकार सुरू आहेत.
गाड्यांचा मोठ्या प्रमाणात आवाज काढणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाहनांच्या दरवाजातून बाहेर लोंबकाळणे, हातवारे करणे, वाहने अतिवेगाने चालवून दुसऱ्या वाहनावर जाणे, कट मारणे, एकासोबतच अनेक वाहनांची एकसात रपेट काढणे, वाहन रस्त्यात पार्किंग करणे आदी प्रकार जोरात सुरु असून त्याचा नाहक त्रास पर्यटकांसह स्थानिकांना होत आहे.
दारू पिऊन गाडी अतिवेगाने चालवल्याने अपघातांमध्ये वाढ होऊन दर दिवशी एकतरी अपघात झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अपघातांमध्ये काही शांततेत वाहन चालविणाऱ्याचा किंवा दुसऱ्या वाहनातील प्रवाशांना जखमी किंवा नाहक बळी जाताना दिसत आहे. मात्र पोलिसांचे या प्रकारात अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत असून या हुल्लडबाजांना आवर घालणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोणी या हुल्लडबाजीला विरोध केल्यास दमदाटी किंवा दारूच्या बाटल्या गाडीवरच ठेवून भरवला जातोय ओपन बार दादागिरीचा वादावादीचा प्रकार घडत असल्याने पर्यटकांची गोची होताना दिसत आहे. पोलिसांनी वेळीच हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सुट्टीच्या दिवशी पर्यटकांचा कास परिसरात ओघ वाढला आहे.
रविवारी सायंकाळी पिसाणी फाट्यावर पर्यटकांची भरधाव आलेली कमांडर जीप पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये एक जण गंभीर झाला आहे त्याला उपचारासाठी साताऱ्यातील रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी बेघूंद होऊन रस्त्यातच गाड्या लावून गाण्यांच्या ठेक्यावर डान्स करत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचाही प्रकार समोर आला होता.








