मेबॅकमधून श्रीमंत शाहू छत्रपतींचे होणार आगमन, गोरज मुहुर्तावर शमीपूजन, बंदुकांच्या फैरीनंतर होणार प्रतिकात्मक सोनं लुटण्याचा कार्यक्रम
कोल्हापूर प्रतिनिधी
करवीरनगरीचा मानबिंदू म्हणून जगप्रसिद्ध असलेला, विजयाचं प्रतिक म्हणून संबोधला गेलेला आणि सामाजिक एकोप्याची विन घट्ट करणारा शाही दसरा मंगळवार 24 रोजी ऐतिहासिक दसरा चौकात थाटामाटात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी ऐतिहासिक मेबॅकमधून श्रीमंत शाहू छत्रपती यांचं दसरा चौकात आगमन होईल. जनतेला अभिवादन करत ते शामियानात विराजमान होतील. त्याच्यासोबत संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती हे ही विराजमान होतील.
बरोबर 6 वाजून 3 मिनिटांच्या गोरज मुहूर्तावर श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते शमीचे पुजन होईल. यानंतर बंदुकांच्या फैरी झडतील आणि करवीरनगरी चौकातील लकडकोटामध्ये सोन्यांच्या पानांची प्रतिकात्मक लुट करतील. लुटलेलं सोनं एकमेकांना देत ‘सोनं घ्या सोनं सोन्या सारखं रहा’, असे म्हणत स्नेहाचा बंध अधिक घट्ट करतील. दरम्यान, अवघ्या काहीच तासांवर येऊन ठेपलेल्या शाही दसरा सोहळयाची तयारी छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टकडून पूर्ण करण्यात आली आहे. चौकात शोभून दिसावे असे करवीर संस्थानचे निशानही उभारले आहे. तसेच चौकाच्या मधोमध उभारलेल्या लकडकोटच्या आतमध्ये तीन ते चार हजार लोक लुट करतील, एवढे आपट्याच्या पानांचे डहाळे बांधले जाणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास हे डहाळे लकडकोटमध्ये बांधले जातील.
साडेचारच्या सुमारास अंबाबाई मंदिरात तोफेची सलामी दिल्यानंतर खऱ्या अर्थाने शाही दसरा सोहळ्याच्या मंगलपर्वला प्रारंभ होईल. करवीर निवासिनी अंबाबाईची पालखी दसरा चौकाच्या दिशेने सोनं लुटण्यासाठी प्रस्थान करेल. पाठोपाठ मोतिबाग तालीमजवळील गुऊमहाराज वाड्यातील गुऊ महाराजांची व तुळजाभवानी मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व तुळजाभवानीमातेच्या पादुका विराजमान असलेली पालखीही चौकात लवाजम्यासह सोनं लुटण्यासाठी दाखल होतील. तिन्ही पालखी चौकात उभारलेल्या शामियानाच्या पश्चिम बाजूला थोपवल्या जातील तर उत्तर बाजूला जहॉगीरदार, सरदार, सरकार यांच्यासह आजी-माजी आमदार-खासदार यांच्या महनीय व्यक्ती विराजमान होतील. यानंतर शाही थाटात श्रीमंत शाहू छत्रपती यांचे मेबॅकमधून आगमन होईल आणि त्यांच्या स्वागतासाठी करवीर संस्थांनच्या गीताची धुन वाजवून शमी पुजनाला प्रारंभ करण्यात येईल.