नवान्न पौर्णिमेला अंबाबाईच्या अन्नपूर्णा रूपाची पूजा; २५ हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद
कोल्हापूर : अकरा दिवस चाललेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाची सांगता मंगळवारी अश्विन पौर्णिमेला मंदिरात महाप्रसादाने झाली. नवान्न पौर्णिमेचे औचित्य साधून अंबाबाई मंदिरात महालक्ष्मी भक्त मंडळ व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
महाप्रसादाचे वाटप जिल्हाधिकारी अमोल येडगे, जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी कार्तीकयन एस., ऋतुराज क्षिरसागर, सचिव शिवराज नाईसवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, राजू मेवेकरी, उद्योगपती शिवाजीराव मोहीते, निरज झंवर, सचिन झंवर, भरत ओसवाल, शहाजीराव जगदाळे, अभिजीत चव्हाण आदींच्या हस्ते झाले. मंगळवारी महाप्रसादानिमित्य अंबाबाईची अन्नपूर्णा रुपात पूजा बांधण्यात आली होती. चारवाजे पर्यंत २५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सकाळी साडेअकरा वाजता रोजचा प्रसाद करणाऱ्या बोंद्रे यांच्या कडील नैवेद्याच्या ताटात पुरणपोळ्यांचा पाचुंदा (पाच पोळ्या) चा आलेला नैवेद्य देवीला व मातृलिंगाला दाखवून भक्तांना महाप्रसाद वाढायला सुरुवात केली.
महाप्रसादा वेळी पाऊस अथवा उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजापासून ते शनी मंदिरापर्यंत पत्र्याचा मंडप उभारण्यात आला होता. दुपारी ४ वाजेपर्यंत या महाप्रसादाचा २५ हजारावर भाविकांनी लाभ घेतला. तसेच नवरात्रोत्सव काळात अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादासाठी महालक्ष्मी भक्त मंडळ व देवस्थान समितीकडे तांदूळ, तेल, डाळ, भरडा, गूळ, विविध प्रकारच्या भाज्या व मसाले असे सर्व जमा केले होते.
घटस्थापनेपासून भाविक मंडळी कोरडा शिधा (तांदूळ, डाळ, गूळ इ.) आणून गरुड मंडपाबाहेर ठेवलेल्या पिंपात ठेवून आपल्या परीनं हातभार लावत असतात. महाप्रसादाचा स्वयंपाक करण्याची सुरूवात सोमवारी चतुर्दशीच्या रात्रीच काहिल पूजनानं झाली. यात भात, आमटी, अळूचं गरगटं आणि गव्हाची खीर, लोणचे असा महाप्रसाद होता. यासाठी २४०० किलो तांदुळ, १२०० किलो भाजी, ८०० किलो भरडा, ८०० किलो गूळ आदी शिधा लागला. अश्विन पौणिमेला या झालेल्या महाप्रसादा नंतर नवरात्रौत्सवाची सांगता होते.








