वृत्तसंस्था / गॅले
दिमुथ करुनारत्ने आणि दिनेश चंडीमल यांच्या शानदार फटकेबाजीने नोंदविलेल्या महत्वाच्या शतकी भागिदारीमुळे येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर यजमान लंकेने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या डावात 4 बाद 237 धावा जमविल्या. या कामगिरीमुळे लंकन संघाने न्यूझीलंडवर एकूण 202 धावांची आघाडी मिळविली आहे.
या पहिल्या कसोटीत लंकेचा पहिला डाव 305 धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 340 धावा जमवित लंकेवर 35 धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडने 4 बाद 255 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात लॅथमने 6 चौकारांसह 70, विलियमसनने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 55, रचिन रविंद्रने 4 चौकारांसह 39,मिचेलने 1 षटकार आणि 7 चौकारांसह 57, ब्लंडेलने 1 षटकार आणि 1 चौकारासह 25, फिलीप्सने 48 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 49 धावा झळकविल्या. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 3 फलंदाजांनी अर्धशतके नोंदविली. लंकेतर्फे जयसुर्याने 136 धावांत 4 तर रमेश मेंडीसने 101 धावांत 3, धनंजय डिसिल्वाने 31 धावांत 2 गडी बाद केले. न्यूझीलंडने पहिल्या डावात लंकेवर 35 धावांची आघाडी मिळविली. तत्पूर्वी लंकेने पहिल्या डावात 305 धावा जमविल्या होत्या.
35 धावांनी पिछाडीवर असलेल्या लंकेने आपल्या दुसऱ्या डावाला सुरूवात केली. पण सलामीचा निशांका केवळ 2 धावांवर बाद झाला. त्यानंतर करुनारत्ने आणि चंडीमल या जेडीने आक्रमक फटकेबाजी करत दुसऱ्या गड्यासाठी 147 धावांची शतकी भागिदारी केली. करुनारत्नेने 127 चेंडूत 6 चौकारांसह 83 तर चंडीमलने 6 चौकारांसह 61 धावा जमविल्या. हे दोन्ही फलंदाज पाठोपाठ बाद झाले. अँजेलो मॅथ्युज आणि कमिंदू मेंडीस यांनी सावध फलंदाजी करण्यावर भर दिला. कमिंदू मेंडीस 13 धावांवर तंबूत परतला. लंकेने यावेळी 4 बाद 178 धावा जमविल्या होत्या. मॅथ्युज व कर्णधार डिसिल्वा यांनी पाचव्या गड्यासाठी अभेद्य 59 धावांची भागिदारी केली. मॅथ्युज 4 चौकारासह 34 तर डिसिल्वा 4 चौकारांसह 34 धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडतर्फे ओरुरकीने 37 धावांत 3 तर पटेलने 1 गडी बाद केला. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे.
संक्षिप्त धावफलक: लंका प. डाव 91.5 षटकात सर्वबाद 305, न्यूझीलंड प. डाव 90.5 षटकात सर्वबाद 340 (लॅथम 70, विलियमसन 55, मिचेल 57, फिलीप्स 49, रचिन रविंद्र 39, जयसुर्या 4-136, रमेश मेंडीस 3-103, डिसिल्वा 2-31), लंका दु. डाव 72 षटकात 4 बाद 237 (करुणारत्ने 83, चंडीमल 61, मॅथ्युज खेळत आहे 34, कमिंदू मेंडीस 13, डिसिल्वा खेळत आहे 34, ओरुरकी 3-37, पटेल 1-68)