ध्रुव शोरे, अक्षय वाडकरचीही अर्धशतके, महाराष्ट्राच्या गोलंदाजांची धुलाई
वृत्तसंस्था/ पुणे
करुण नायरचे नाबाद शतक व ध्रुव शोरे, अक्षय वाडकर यांच्या शानदार खेळीच्या जोरावर विदर्भाने महाराष्ट्राविरुद्ध लढतीत पहिल्या डावात 6 बाद 439 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विदर्भाकडे 231 धावांची आघाडी असून दिवसअखेरीस करुण नायर 129 व हर्ष दुबे 13 धावांवर खेळत होते.
पहिल्या दिवशी महाराष्ट्राला अवघ्या 208 धावांत गुंडाळल्यानंतर विदर्भाने 1 बाद 111 धावा केल्या होत्या. या धावसंख्येवरुन विदर्भाने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. पहिल्या सत्रात यश राठोडला 42 धावांवर इंगळेने बाद करत विदर्भाला दुसरा धक्का दिला. यानंतर ध्रुव शौरेने 14 चौकारासह 92 धावांची खेळी साकारली. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या ध्रुवला आशय पालकरने बाद केले. मोहित काळेही स्वस्तात बाद झाला. दुसरीकडे, करुण नायरने मात्र कर्णधार अक्षय वाडकरला सोबत घेत संघाला चारशेचा टप्पा गाठून दिला. या जोडीने 149 धावांची भागीदारी साकारली. नायरने शानदार शतक खेळी साकारताना 18 चौकारासह नाबाद 128 धावा केल्या. वाडकरने त्याला चांगली साथ देत 12 चौकारासह 90 धावांचे योगदान दिले. वाडकरला प्रदीप दाढेने बाद करत ही जोडी फोडली. यानंतर नायरने दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसऱ्या दिवसअखेरीस विदर्भाने 106 षटकांत 6 बाद 439 धावा केल्या होत्या. आज तिसऱ्या दिवशी त्यांचा आघाडी वाढवण्याचा प्रयत्न असेल.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र पहिला डाव 208
विदर्भ पहिला डाव 106 षटकांत 6 बाद 439 (करुण नायर खेळत आहे 128, ध्रुव शौरे 92, अक्षय वाडकर 90, हर्ष दुबे खेळत आहे 13, प्रदीप दाढे व आशय पालकर प्रत्येकी दोन बळी).
छत्तीसगडने मुंबईला 351 धावांवर गुंडाळले, आशिष चौहानचे 6 बळी
रायपूर : पृथ्वी शॉ व भुपेन लालवाणी यांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर पहिला दिवस मुंबईने गाजवला. दुसऱ्या दिवशी मात्र छत्तीसगडचा स्टार गोलंदाज आशिष चौहानच्या भेदक माऱ्यासमोर इतर मुंबईच्या फलंदाजांनी लोटांगण घातले.3 बाद 291 धावासंख्येवरुन मुंबईचा पहिला डाव 351 धावांवर आटोपला. चौहानने 105 धावांत 6 बळी घेत मुंबईच्या डावाला भगदाड पाडले. यानंतर दुसऱ्या दिवसअखेरीस छत्तीसगडने सावध सुरुवात करताना 66 षटकांत 4 बाद 180 धावा केल्या आहेत. अद्याप ते 171 धावांनी पिछाडीवर आहेत.
घरच्या मैदानावर तमिळनाडूची घसरगुंडी, दिवसअखेरीस 7 बाद 129
चेन्नई : रणजी चषक स्पर्धेतील तामिळनाडूविरुद्ध लढतीत देवदत्त पडिक्कलच्या शतकी खेळीच्या जोरावर कर्नाटकने पहिल्या डावात 366 धावा केल्या. पडिक्कल वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने कर्नाटकला चारशेचा टप्पा गाठता आला नाही. घरच्या मैदानावर खेळताना तमिळनाडूच्या फलंदाजांनी देखील सपशेल नांगी टाकली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा तमिळनाडूने 56 षटकांत 7 बाद 129 धावा केल्या होत्या. बाबा इंद्रजीत 35 धावांवर खेळत असून तमिळनाडू अद्याप 237 धावांनी पिछाडीवर आहे.









