वृत्तसंस्था/ लखनौ
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेतील होणाऱ्या आगामी उर्वरित सामन्यांसाठी लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार के. एल. राहूल दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. या संघाच्या फ्रांचाईजीने के. एल. राहूलच्या जागी करुण नायरची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे.
लखनौ सुपर जायंट्सच्या फ्रांचाईजीने करुण नायरला 50 लाख रुपयांच्या बोलीवर करारबद्ध केले आहे. दरम्यान के. एल. राहूल दुखापतीमुळे 7 जून रोजी लंडनच्या ओव्हल मैदानावर होणाऱ्या आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळू शकणार नाही. के. एल. राहूलच्या या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. चालू आठवड्याच्या प्रारंभी बेंगळूर संघाविरुद्धच्या सामन्यात खेळताना राहूलला क्षेत्ररक्षणावेळी ही दुखापत झाली होती. करुण नायरने कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक नोंदविले आहे. तसेच त्याने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 76 सामन्यात 1496 धावा जमविल्या आहेत.









