वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
केरळ राज्य साक्षरता मोहिमेच्या अंतर्गत वयाच्या 96 व्या वर्षी विद्यार्थिनी होत इतिहास रचणाऱ्या कार्तियानी अम्मा यांचे 10 ऑक्टोबर रोजी अलाप्पुझा जिल्ह्यातील चेप्पाड गावात निधन झाले आहे. निधनासमयी त्या 101 वर्षांच्या होत्या. कार्तियानी अम्मा या दीर्घकाळापासून आजारी होत्या. केंद्र सरकारने त्यांना यापूर्वी नारी शक्ती पुरस्काराने गौरविले होते. तसेच साक्षरता मोहिमेसाठी कार्तियानी अम्मा यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले होते.
कार्तियानी अम्मा यांनी इयत्ता चौथीच्या तोडीची ‘अक्षरलक्षम’ परीक्षेत यश मिळविले होते. साक्षरता परीक्षेचे आयान 5 ऑगस्ट 2018 रोजी झाले होते, ज्यात 42,933 जणांनी भाग घेतला होता. या लोकांमध्ये कार्तियानी अम्मा या सर्वात वृद्ध होत्या. कार्तियानी अम्मा यांनी इयत्ता 10 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. केरळ सरकारने राज्यात ‘अक्षरालक्षम साक्षरता’ नावाने मोहीम राबविली होती. केरळमध्ये 100 टक्के साक्षरतेचे लक्ष्य प्राप्त करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. 2019 मध्ये कार्तियानी अम्मा या कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग गुडविल अॅम्बेसिडर झाल्या आणि मार्च 2020 मध्ये महिला दिनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले होते.









