प्रतिनिधी/ बेळगाव
नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान दादा अष्टेकर भक्त मंडळाच्यावतीने रविवार दि. 6 रोजी कार्तिक उत्सवानिमित्त 25 नद्यांचा जलरुद्राभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शनिवारी ज्योतिर्लिंग देवाला सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आली होती.
प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही कार्तिक उत्सव साजरा होत आहे. रविवारी सकाळी 7.30 वाजता 25 नद्यांचे पाणी आणि 5 कुंडातील तीर्थाची समादेवी गल्ली येथील समादेवी मंदिरापासून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर जोतिबा देवाला सरस्वती (अलाहाबाद), गोमती (लखनऊ), अलकनंदा (उत्तराखंड), गंगोत्री-यमुनोत्री (उत्तराखंड), अम्रजा (गाणगापूर), काळी (दांडेली) निरा (पुणे), भीमा (सोलापूर) लक्ष्मी (शिमोगा), आकाशगंगा (तिरुपती), नेत्रावती (धर्मस्थळ), कावेरी (म्हैसूर), तुंगभद्रा (होसपेट), गोदावरी (नाशिक), सावित्री, गायत्री, वेण्णा, कोयना, कृष्णा (महाबळेश्वर), चंद्रभागा (पंढरपूर), पंचगंगा (कोल्हापूर), दूधगंगा (कागल), हिरण्यकेशी (संकेश्वर), वेदगंगा (निपाणी), घटप्रभा (सुतकट्टी), मार्कंडेय (आंबेवाडी), ताम्रपर्णी (कोवाड), मलप्रभा (खानापूर) या नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात येणार आहे.
याचबरोबर जोतिबा कुंड, रामकुंड, येणीकुंड, कुशावर तीर्थ, कपिलनाथ कुंडातील पाण्याने जलरुद्राभिषेक केला जाणार आहे. सायंकाळी 7 नंतर महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









