दिग्दर्शक शिमित अमिन यांचा चित्रपट
अभिनेता कार्तिक आर्यन हा ‘कॅप्टन इंडिया’ चित्रपटात वायुदल वैमानिकाची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. कार्तिकची निवड दिग्दर्शक शिमित अमिन यांच्या चित्रपटात झाली असून यात तो वैमानिकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. शिमित यांना ‘अब तक छप्पन’ आणि ‘चक दे! इंडिया’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. कार्तिक आणि शिमित यांच्यात मागील एक वर्षापासून बोलणी सुरू आहेत. दोघांदरम्यान अनेक विषयांवर चर्चा सुरू हाहेती. याचदरम्यान शिमितने कार्तिकसमोर ‘कॅप्टन इंडिया’ची कहाणी मांडली होती. कार्तिकने या कहाणीला होकार दर्शविला आहे.
शिमित या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरु करण्याच्या तयारीत आहे. चित्रपटाची कहाणी सत्यघटनेवर आधारित असणार आहे. याचे चित्रिकरण भारत तसेच मोरक्कोमध्ये पार पडणार आहे. हा चित्रपट 2027 च्या पहिल्या सहामाहीत प्रदर्शित केला जाऊ शकतो. कार्तिक सध्या ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे.









