वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्हिसासाठी लाच प्रकरणामध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र खासदार कार्ती चिदंबरम यांची सीबीआयने सलग तिसऱया दिवशी कसून चौकशी केली आहे. चिनी कामगारांना भारताचा व्हिसा मिळवून देण्यासाठी 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पंजाबमधील तलवंडी साबो येथील वीजनिर्मिती प्रकल्पावर काम करण्यासाठी या कामगारांना कार्ती चिदंबरम यांनी लाच घेऊन व्हिसा मिळवून दिला असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
शनिवारी सकाळीच चिदंबरम यांना येथील सीबीआय मुख्यालयात पाचारण करण्यात आले होते. सहा अधिकाऱयांच्या चौकशी दलाने त्यांची चौकशी केल्याचे सांगण्यात आले. ही चौकशी दिवसभर चालली. ही चौकशी राजकीय सूडबुद्धीने सुरू असल्याचा आरोप कार्ती चिदंबरम यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात 14 मे या दिवशी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह एस. भास्कर रामन या त्यांच्या सहकाऱयावरही आरोप दाखल करण्यात आला आहे. वीजनिर्मिती करणारी सदर कंपनी वेदांता गटाशी संबंधित आहे.









