विविध धार्मिक कार्यक्रम : महाप्रसादाने सांगता
प्रतिनिधी /बेळगाव
नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान दादा अष्टेकर भक्त मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रविवारी कार्तिकोत्सव उत्साहात पार पडला. सकाळी 25 नद्यांचे पाणी आणि 5 कुंडांतील तीर्थाची समादेवी गल्ली येथून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. नद्यांबरोबर जोतिबा कुंड, रामकुंड, येणीकुंड, कुशावर तीर्थ, कपिलनाथ कुंडातील पाण्याने जलरुद्राभिषेक करण्यात आला.
सकाळी मंदिरात होमहवन, अभिषेक, नवग्रह पूजन आणि सत्यनारायण पूजा झाली. अष्टेकर दांपत्याच्या हस्ते विविध धार्मिक कार्यक्रम झाले. रात्री महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी मोठय़ा संख्येने भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रघु जोशी यांनी यावेळी पौरोहित्य केले. रात्री मंदिरात गोंधळ घालून जागर करण्यात आला. यावेळी भक्त मंडळी व नागरिक उपस्थित होते.









