वृत्तसंस्था/चेन्नई
चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत भारतीय ग्रँडमास्टर एम कार्तिकेयनने आपल्याच देशाच्या विदित गुजरातीवर शानदार विजय मिळविला तर जर्मनीचा जीएम व्हिन्सेंट कीमरने जेतेपदावरील आपली पकड आणखी मजबूत केली. कार्तिकेयनने काळ्या मोहरांनी खेळताना गुजरातीवर मात केली तर कीमरने अमेरिकन जीएम अवंडर लियांगवर सफाईदार विजय मिळविला. कीमर आता जवळच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा 1.5 गुणांनी आघाडीवर आहे. अर्जुन एरिगेसीला सातव्या फेरीत हॉलंडच्या अनीश गिरीने बरोबरीत रोखल्याने त्याच्या जेतेपदाच्या आशेला धक्का बसला आहे. या स्पर्धेच्या अजून दोन फेऱ्या बाकी आहेत.
मास्टर्स विभागात जीएम निहाल सरिनने जीएम रे रॉबसनचा पराभव केला तर जीएम जॉर्डन व्हान फोरीस्ट व जीएम व्ही प्रणव यांचा डाव अनिर्णीत राहिला. अजून दोन फेऱ्या बाकी असून अर्जुंन एरिगेसीची आठव्या फेरीत गुजरातीशी लढत होईल. त्याच्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून त्याला विजय आवश्यक आहे. याशिवाय त्याला जेतेपदाचे आव्हान राखण्यासाठी अन्य निकाल आपल्याला पूरक होतील, असे लागण्याची अपेक्षा करावी लागेल. लियांगचीही अर्जुनसारखीच स्थिती असून त्याची लढत गिरीशी होणार आहे. दरम्यान, पुढील फेरीत कीमरने व्हान फोरीस्टवर विजय मिळविल्यास त्याचे पहिले चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धेचे जेतेपद निश्चित होईल.
चॅलेंजर्स विभागात जीएम लिऑन
ल्युक मेन्डोन्साने जीएम दीप्तायन घोषवर विजय मिळवित संयुक्त आघाडीचे स्थान कायम राखले आहे तर एम. प्रणेशनेही जीएम आर. वैशालीवर विजय मिळवित आघाडी राखली आहे. जीएम अभिमन्यू पुराणिकला जीएम आर्यन चोप्राने बरोबरीत रोखले. त्यामुळे पुराणिक अर्ध्या गुणाने आघाडीवीरापेक्षा मागे राहिला. आयएम हर्षवर्धन जीबीने हरिका द्रोणावल्लीवर मात केली.









