मुरलीकांत पेटकर यांच्यावर आधारित चित्रपट
कार्तिक आर्यन लवकरच कबीर खानचा चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक हा स्पोर्ट्स हिरोच्या भूमिकेत दिसून येणार आहे. कार्तिकच्या या चित्रपटाचे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी कनेक्शन आहे. सुशांत सिंह हा माजी सैन्याधिकारी अणि स्पोर्ट्सपर्सन मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करणार होता. सुमारे 7 वर्षांपूर्वी या चित्रपटाची ऑफर सुशांतला देण्यात आली होती.

पेटकर यांची कहाणी मला अत्यंत आवडली होती. त्यांची कहाणी ऐकून मी भावुक झालो होतो. पेटकर यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी उत्सुक आहे. मोठी स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तिरेखा साकारणे मला आवडते असे सुशांतने म्हटले होते. परंतु सुशांतने आत्महत्या केल्याने हा चित्रपट गुंडाळावा लागला होता. परंतु कबीर खान आता कार्तिक आर्यनला सोबत घेऊन पेटकर यांच्यावर आधारित या चित्रपटाची निर्मिती करत आहे. कार्तिककरता ही मोठी संधी ठरणार आहे. स्वत:ची अभिनयक्षमता दाखवून देण्यासाठी कार्तिकला हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. या चित्रपटातील नायिकेचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
मुरलीकांत पेटकर यांनी 1972 च्या हाइडलबर्ग (जर्मनी) पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकाविले होते. त्यांनी यात 50 मीटरच्या फ्रीस्टाइल स्वीमिंगमध्ये विश्वविक्रम केला होता. मुरलीकांत यांनाच चंदू चॅम्पियन असे टोपणनाव मिळाले आहे. पेटकर यांना 2018 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्रीने गौरविण्यात आले आहे. मुरलीकांत पेटकर हे मूळचे महाराष्ट्रातील आहेत. भारतीय सैन्यात इलेक्ट्रॉनिक्स अणि मॅकेनिकल इंजिनियर्स कोरमध्ये ते कार्यरत होते. 1965 च्या युद्धात त्यांना 9 गोळ्या लागल्या होत्या, यामुळे त्यांना दिव्यांगत्व आले होते.









