मुंबई / वृत्तसंस्था
कर्नाटकातील सिनी शेट्टी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 ची विजेती ठरली आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनरअप (पहिली उपविजेती), तर उत्तर प्रदेशातील शिनाता चौहान फेमिना मिस इंडिया 2022 ची सेकंड रनरअप (द्वितीय उपविजेती) ठरली. या तिघांनीही 31 स्पर्धकांवर मात करत मिस इंडिया स्पर्धेत अव्वल येण्याचा मान मिळवला. मिस इंडिया 2022 चा ग्रँड फिनाले 17 जुलै रोजी दुपारी 12 आणि संध्याकाळी 5 वाजता कलर्स वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.
शॉर्टलिस्ट केलेले अंतिम स्पर्धक रविवारी मुंबईतील अंतिम स्पर्धेत एकवटले होते. याप्रसंगी प्रति÷ित फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 स्पर्धेतील कठोर प्रशिक्षण आणि ग्रूमिंग सत्रे पार पाडली. त्यानंतर अंतिम निकालावेळी 2020 ची विजेती मानसा वाराणसी हिने सिनी शेट्टी हिला मिस इंडियाचे ताज प्रदान केले. बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया, मलायका अरोरा, अभिनेता दिनो मोरिया, डिझायनर रोहित गांधी आणि राहुल खन्ना, कोरिओग्राफर श्यामक डावर आणि क्रिकेटर मिताली राज आदींनी या फिनालेमध्ये ज्युरी म्हणून काम पाहिले.
या स्पर्धेतील विजेती सिनी शेट्टी हिने आपल्या सौंदर्याने आणि हुशारीने सर्वांचीच मने जिंकली. 21 वषीय सिनी शेट्टीचा जन्म मुंबईत झाला असला तरी ती मूळची कर्नाटकची आहे. तिने अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. सध्या ती चार्टर्ड फायनान्शियल ऍनालिस्ट कोर्स करत आहे. तिला लहानपणापासूनच नृत्याची खूप आवड आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिने नृत्य शिकण्यास सुरुवात केली आणि वयाच्या 14 व्या वषी भरतनाटय़म कौशल्य आत्मसात केले.