वृत्तसंस्था /बेंगळूर
2024 साली होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये कर्नाटकातील भारताचे प्रतिनिधीत्व करणारे आर. व्ही. रघुप्रसाद यांची हॉकी पंच पॅनेलमध्ये निवड करण्यात आली आहे. आंतराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या झालेल्या नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये पॅरीस ऑलिम्पिकसाठी 28 पंचांची निवड करण्यात आली आहे. पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 दरम्यान होणार आहे. सामाजिक क्षेत्राप्रमाणे आता क्रीडा क्षेत्रातही पुरुष याप्रमाणेच महिलांनाही समान स्थान मिळावे यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांनी महिलांनाही प्राधान्य ठरवले आहे. पंच, तांत्रिक अधिकारी या विभागातही आता यापुढे पुरुषांप्रमाणेच महिलांचीही निवड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. भारताचे हॉकी पंच आर. व्ही रघुप्रसाद यांनी यापूर्वी दोनवेळा ऑलिम्पिक स्पर्धेत पंचगिरी केली असून त्यांना आता या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पंचगिरी करण्याची संधी तिसऱ्यांदा मिळत आहे. 2012 च्या लंडन तर त्यानंतर 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली होती. आतापर्यंत रघुप्रसाद यांनी ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, विश्वचषक हॉकी स्पर्धांमधील 186 सामन्यात पंच म्हणून कार्यरत होते. दरम्यान हेंगझोयु 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही रघुप्रसाद हे हॉकीचे पंच म्हणून कार्यरत राहणार आहेत. या स्पर्धेसाठी भारताच्या सात हॉकी पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे.









