वृत्तसंस्था/ राजकोट
36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कर्नाटकाची महिला जलतरणपटू हशिका रामचंद्रने चौथे सुवर्णपदक पटकाविले. महिलांच्या 4ƒ200 फ्रि स्टाईल सांघिक रिलेमध्ये कर्नाटकाने सुवर्णपदक मिळविले. या संघामध्ये हशिका रामचंद्रचा समावेश आहे.
कर्नाटकाची 14 वषीय महिला जलतरणपटू हशिका रामचंद्रने या स्पर्धेत जलतरण या क्रीडा प्रकारात आतापर्यंत 4 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत तिने यापूर्वी महिलांच्या 200 मी. बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. महिलांच्या फ्रि स्टाईल रिले सांघिक प्रकारात हशिकाने अंतिम टप्प्यात आस्था चौधरीला मागे टाकत कर्नाटकाला सुवर्णपदक मिळवून दिले. कर्नाटकाच्या महिला रिले संघाने या क्रीडा प्रकारात 2 मिनिटे 19.12 सेकंदाचा अवधी नोंदविला. हशिकाचा या स्पर्धेतील हा तिसरा नवा राष्ट्रीय विक्रम आहे. महिलांच्या 10 मी. प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने सुवर्णपदक मिळविले. गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत या स्पर्धेतील ऋतिकाचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.
पुरुषांच्या 200 मी. बटरफ्लायमध्ये साजन प्रकाशने नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. या अनुभवी जलतरणपटूचे या स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत साजन प्रकाशने दोन रौप्यपदकेही मिळविली आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात सेनादलाने आघाडीचे स्थान मिळविताना 40 सुवर्णपदकांसह 89 पदके मिळविली आहेत. हरियाना 25 सुवर्णपदकांसह दुसऱया तर महाराष्ट्र 24 पदकांसह तिसऱया स्थानावर आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या 32 राज्यांच्या पथकांनी किमान एक सुवर्णपदक आतापर्यंत मिळविले आहे. जलतरण प्रकारात यजमान गुजरातनेही पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवून अनपेक्षित धक्का दिला.
गुजरातची महिला टेनिसपटू झिल देसाईने महिला एकेरीचे सुवर्णपदक पटकाविले. तृतीय मानांकित झिल देसाईने कर्नाटकाच्या शर्मदा बाळूचा 6-2, 3-2 असा पराभव केला. कर्नाटकाची शर्मदा हिला दुखापत झाल्याने तिने दुसरा सेट चालू असताना माघार घेतली. तामिळनाडूच्या मनीष सुरेशकुमारने महाराष्ट्राच्या अर्जुन कढेचा 2-6, 6-1, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत पुरुष एकेरीचे जेतेपद पटकाविले. स्क्वॅश या क्रीडा प्रकारात तामिळनाडूच्या सुनयना कुरुविलाने महिला एकेरीतील सुवर्णपदक मिळविताना महाराष्ट्राच्या उर्वशी जोशीचा पराभव केला. या लढतीमध्ये महाराष्ट्राच्या उर्वशीने पहिले दोन गेम्स जिंकले. पण त्यानंतरचे तीन गेम्स सुनयना कुरुविलाने जिंकत सुवर्णपदक मिळविले. पुरुष आणि महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात अनुक्रमे हरियानाचा ऋषभ यादव आणि महाराष्ट्राची आदिती गोपीचंद स्वामी यांनी सुवर्णपदके मिळविली. अंतिम फेरीत ऋषभ यादवने महाराष्ट्राच्या ओजस देताळेचा 148-147 अशा केवळ एक गुणाच्या फरकाने पराभव केला. महिलांच्या विभागात महाराष्ट्राच्या आदितीने दिल्लीच्या प्रगतीवर 144-143 अशा गुणांनी मात केली. लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात पुरुष एकेरीत आसामच्या सुनील बहाद्दूरने सुवर्णपदक मिळविताना झारखंडच्या बॅनर्जीचा 16-9 असा पराभव केला.









