लक्कुंडी शिल्पकला ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू
प्रतिनिधी/ नवी दिल्ली
रविवारी नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात भाग घेतलेल्या कर्नाटकाच्या लक्कुंडी शिल्पकलेवर आधारित चित्ररथाला टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळाला. राजपथावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी या चित्ररथाचे कौतुक केले. यावर्षीही कर्नाटकाच्या विशिष्ट चित्ररथाला मतदानातून नागरिकांनी पाठिंबा देण्याचे आवाहन माहिती खात्याचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांनी केले आहे.
माहिती व सार्वजनिक संपर्क खात्याच्यावतीने दरवर्षी वैशिष्ट्यापूर्ण चित्ररथ तयार केला जातो. यंदा लक्कुंडी येथील ऐतिहासिक देवालयांच्या शिल्पकलेवर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला आहे. लक्कुंडी येथे शैव, जैन व वैष्णव देवालये आहेत. ही देवालये शिल्पकलेचे अद्भूत नमुने ठरले आहेत.
कर्तव्यपथावर झालेल्या पथसंचलनात भाग घेण्यासाठी हुबेहूब लक्कुंडी देवालयाचा चित्ररथ तयार करण्यात आला होता. या चित्ररथाने कर्नाटकातील प्राचीन शिल्पकलेच्या श्रीमंत संस्कृतीचे दर्शन घडवले. माहिती खात्याचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांच्या पुढाकारातून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलादिग्दर्शक शशिधर अडप यांच्या दिग्दर्शनातून तो तयार झाला आहे.
संगीत दिग्दर्शक प्रवीण डी. राव यांनी यासाठी संगीत दिले आहे. म्हैसूर, बेंगळूर, गदग व धारवाडहून आलेल्या अठरा कलाकारांनी वाद्य वाजवत या पथसंचलनात भाग घेतला. तर उर्वरित दहा कलाकार चित्ररथावर होते. 10 ते 12 व्या शतकापर्यंत लक्कुंडी एक मोठे व्यापारी केंद्र होते. अनेक राजघराण्यांनी लक्कुंडीवर राज्य केले आहे. चालुक्य घराणे हे यामध्ये प्रमुख आहे.
लक्कुंडीत 50 देवालये आहेत. अधिकाधिक शिवसमर्पित आहेत. 101 पायऱ्यांची पुष्करिणी (विहीर) आहे. 2022 मध्ये द्वितीय, 2015 मध्ये तृतीय, 2012 मध्ये तृतीय, 2011 मध्ये द्वितीय, 2008 मध्ये द्वितीय व 2005 मध्ये वैराग्यमूर्ती बाहुबलीच्या महामस्तकाभिषेकाच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक मिळाले होते.









