कोल्हापूर :
जोतिबा दर्शनासाठी आलेल्या कर्नाटकातील तरुणाचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. शंकर जालिंदर गवळीकर (वय 32 रा. मु. पो. मिरखल, ता.बसू कल्याण, जि.बिदर, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली.
शंकर गवळी हा बांधकाम कामगार होता. शंकर आणि त्याच्याबरोबर नऊ मित्र रविवारी जोतिबा दर्शनासाठी आले होते. जोतिबा डोंगरावर जाण्यापूर्वी ते पंचगंगा नदीवर आंघोळीसाठी थांबले होते. आंघोळ करत असताना शंकर पाण्यात उतरला. काही वेळ पोहून तो काठावर आला. अंगाला साबण लावून पुन्हा तो नदीत गेला. त्यावेळी तो पाण्यात बुडाला. यावेळी मित्रांनी त्याचा शोध घेतला पण सापडला नाही. अग्निशमन दलाला ही माहिती दिल्यावर दलाचे जवान पंचगंगा घाटावर दाखल झाले. पण दलाच्या जवानांना तो सापडला नाही. यानंतर जीवरक्षक उदय निंबाळकर यांना पाचारण करण्यात आले. निंबाळकर यांनी खोल पाण्यात जावून दहा मिनिटात शंकर गवळीकर याचा मृतदेह पाण्याबाहेर आणला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणीनंतर गवळीकर याचा मृतदेह मित्रांच्या ताब्यात देण्यात आला. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.








