वृत्तसंस्था / अहमदाबाद
2024 च्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या क गटातील सामन्यात कर्नाटकाने अरुणाचलप्रदेशचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव करत आपली विजय घोडदौड कायम राखली आहे..या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या अरुणाचलप्रदेशचा डाव 43.2 षटकात 166 धावांत आटोपला. त्यानंतर कर्नाटकाने 14.2 षटकात बिनबाद 171 धावा जमवित हा सामना 214 चेंडू बाकी ठेवून 10 गड्यांनी जिंकला,.
अरुणाचलप्रदेशच्या डावात अभिनव सिंगने 100 चेंडूत 1 षटकार आणि 7 चोकारांसह नाबाद 71, राजेंद्र सिंगने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 30, हार्दीक वर्माने 2 चौकारांसह 38 धावा जमविल्या. कर्नाटकातर्फे हार्दीक राजने 30 धावांत 4 तर कौशिकने 30 धावांत 4 तसेच श्रेयस गोपाल आणि अगरवाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार मयांक अगरवालने 45 चेंडूत 7 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 100 तर अभिनव मनोहरने 41 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 66 धावा झळकविल्या. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 14.2 षटकात अभेद्य 171 धावांची शतकी भागिदारी करुन संघाला एकहाती विजय मिळवून दिला.संक्षिप्त धावफलक: अरुणाचलप्रदेश 43.2 षटकात सर्वबाद 166 (अभिनव सिंग 71, हार्दीक वर्मा 38, राजेंद्र सिंग 30, हार्दीक राज 4-30, कौशिक 4-30, गोपाल आणि अगरवाल प्रत्येकी 1 गडी बळी), कर्नाटक 14.2 षटकात बिनबाद 171 (मयांक अगरवाल नाबाद 100, अभिनव मनोहर नाबाद 66)









