बेंगळूर प्रतिनिधी
सुधारित इयत्ता 10 च्या पाठ्यपुस्तकांवरून कर्नाटकात राजकीय गोंधळ सुरू असताना, पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समितीचे अध्यक्ष रोहित चक्रतीर्थ यांच्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. राज्यतील विरोधी पक्षनेते आणि संघटना चक्रतीर्थ याच्यावर पाठ्यपुस्तकात वादग्रस्त प्रकरणे जोडल्याबद्दल आक्षेप घेत होतेच पण आता त्यांच्या काही ट्विट्समुळे कर्नाटक राजकारणाचे वातावरण तापले आहे.
चक्रतीर्थने ट्विटरवर तीव्र लैंगिकता असलेला मजकूर पोस्ट केला होता. यापैकी एका ट्विटमध्ये, तक्रतीर्थ यांनी क्रिकेट सामना पाहणे हे पॉर्न पाहण्यासारखे आहे असे वक्तव्य केले. तसेच स्त्रीवादाबद्दल बोलताना अश्लील टिप्पणी करत असे म्हटले आहे की “स्त्रीवाद हा असा विश्वास आहे की केवळ त्यांपैकी एकावर लक्ष केंद्रित करून दोन्ही लिंग समान होऊ शकतात.” चक्रतीर्थ यांनी महिला ड्रायव्हर्सबद्दल हीन विनोद करून इतर अश्लील ट्विट देखील पोस्ट केल्या होत्या. या ट्विटनंतर त्यांचे अकाउंट आता खाजगी करण्यात आले आहे.
यावर आपली प्रतिक्रीया देताना चक्रतीर्थ यांनी दावा केला की, गेल्या काही आठवड्यांपासून विरोधक त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या ट्विटचा या पाठ्यपुस्तकांच्या पुनरावलोकनाशी काहीही संबंध नाही.” तथापि, विरोधी पक्षनेत्यांनी चक्रतीर्थच्या पुनरावलोकन समितीमधून राजीनामा देण्याची मागणी वाढत आहे. कर्नाटक काँग्रेसचे डीके शिवकुमार यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “त्यांच्या अशा प्रकारच्या घाणेरड्या पोस्ट्सवरून हे दिसून येते की बोम्माई यांचे भाजप सरकार कोणत्या प्रकारच्या लोकांना प्रोत्साहन देत आहे”.