किमान वेतन 31 हजार रु. निश्चित करा
बेळगाव : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान 31 हजार वेतन निश्चित करावे, ग्राम पंचायतीमध्ये डाटा एंट्री ऑपरेटरचे पद भरा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बदलीची सुविधा उपलब्ध करा, ग्राम पंचायतींमध्ये लेखा साहाय्यक पद निर्माण करा, गंभीर आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा खर्च द्या, सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दरमहा सहा हजार रुपये वेतन द्या, आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य ग्रामपंचायत नोकर संघातर्फे विधानसौध परिसरात आंदोलन छेडण्यात आले. ग्राम पंचायतींमध्ये कित्येक वर्षांपासून कर्मचारी सेवेत आहेत. सध्याच्या वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन किमान 31 हजार रुपये निश्चित करण्यात यावे. ग्राम पंचायतींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती किंवा मृत्यू झाल्यास त्यांना दरमहा 6 हजार रुपये वेतन देण्यात यावे. त्याबरोबरच ग्राम पंचायतींमधील कारभार सुरळीतपणे होण्यासाठी डाटा एंट्री ऑपरेटरची रिक्त पदे तातडीने भरा, अशी मागणीही करण्यात आली आहे. स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये कचरावाहू वाहन देण्यात आले आहे. या वाहनावर वाहनचालक व मदतनिसाची नेमणूक करण्यात आली आहे. या वाहनावरील चालक आणि मदतनिसाला विमा आणि इतर सुविधा लागू करा, अशी मागणीही करण्यात आली आहे.









