विविध भागात 90 ते 100 टक्के विद्यार्थ्यांना लाभ : राज्यात 62 ते 88 टक्के प्रगती
बेळगाव : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सुरू असलेल्या मध्यान्ह आहार योजनेमध्ये कर्नाटक सरकारने प्रत्येक वर्षी प्रगती चालवली आहे. विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार ताजा व पौष्टिक मिळत असल्याने विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांमध्येही समाधान आहे. धान्याचा वापर, कुशल स्वयंपाकी यामुळे मध्यान्ह आहाराचा दर्जा उंचावला आहे. चालू वर्षात 90 ते 100 टक्के प्रगती केली आहे. स्वयंपाक्यांना मानधन, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी त्याचबरोबर शाळा आवारात बागकाम यासारख्या उपक्रमात राज्याने 62 ते 88 टक्के प्रगती साधली असल्याचे सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.
2023 मध्ये 53,284 शाळातून 43.97 लाख विद्यार्थ्यांनी (94 टक्के) मध्यान्ह आहाराचा लाभ घेतला आहे. धान्याचा वापर 92 टक्के, उत्पादन खर्च 94 टक्के, स्वयंपाक घर व धान्यसंग्रह केंद्र तसेच स्वयंपाकाची साधने, एलपीजीचा वापर करणारे स्वयंपाक घर यामध्ये शंभर टक्के प्रगती साधण्यात आली आहे. राज्यातील 53,284 शाळांमधून एलपीजी गॅसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, यावरच मध्यान्ह आहार तयार करण्यात येत आहे. मध्यान्ह आहार बनविणाऱ्या स्वयंपाक्यांच्या साहाय्यकांना मानधन देण्यामध्ये 85 टक्के प्रगती साधली आहे. केंद्र सरकारने 85.72 कोटी रुपये अनुदान वितरण केले असून याचा 72.78 कोटी रुपये वापर करण्यात आलेला आहे.
मध्यान्ह आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
मध्यान्ह आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होत असते. त्यानुसार राज्यात 38.39 लाख विद्यार्थ्यांत जंतरोधक औषध व रक्ताचे प्रमाण कमी असलेले (अॅनिमिया) काही विद्यार्थी तपासणीत आढळून आले असून उर्वरित 5.8 लाख विद्यार्थ्यांची तपासणी अद्याप करणे बाकी आहे. बेळगाव, चिकोडी, बळ्ळारी, कोप्पळ व यादगिरी या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झालेली नाही, असे समजते.
स्वयंपाकघर दुरुस्तीसाठी 3.90 कोटीचे वितरण
आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सर्वसाधारणपणे विद्यार्थ्याचे वजन, उंची, दातांचे आरोग्य, शरीरातील रक्ताचे प्रमाण यांची तपासणी करावी, असा आदेश केंद्र सरकारच्या पीएम पोषक अभियानाच्या प्रमुखांनी राज्य शिक्षण खात्याला बजावलेला असून त्यानुसार कार्य सुरू आहे. स्वयंपाकघर दुरुस्तीसाठी केंद्र सरकारने 3.90 कोटी रुपये वितरण करण्यात येणार आहेत. यामध्ये 3,096 स्वयंपाकघरांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.









