बेळगाव : सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने राज्य सरकारने कर्नाटक पब्लिक स्कूल सुरू केले. परंतु पाच वर्षे उलटली तरी अद्याप या शाळांना इंग्रजी शिक्षक मिळालेले नाहीत. त्यामुळे आहेत त्याच शिक्षकांवर कर्नाटक पब्लिक स्कूल सुरू ठेवावे लागत आहे. इंग्रजी शिक्षक द्यायचे नव्हते तर कर्नाटक पब्लिक स्कूल सुरूच का केले, अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे. जून 2018 मध्ये बेळगावसह राज्यात 248 सरकारी शाळांमध्ये पब्लिक स्कूल सुरू करण्यात आले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक याप्रमाणे कर्नाटक पब्लिक स्कूल सुरू झाले. विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेच्या धर्तीवर सरकारी शाळांमध्ये दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावे, यासाठी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु या शाळांना अद्याप शिक्षक उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. राज्य सरकारने इंग्रजी माध्यमासाठी शिक्षक भरतीच केली नसल्याने आहेत त्याच शिक्षकांवर शाळा चालवावी लागत आहे. बेळगाव व चिकोडी या दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये 1900 च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये इंग्रजी शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये सत्तीगेरी, मुगळीहाळ, के. के. कोप, यकुंडी, तर शहरात रामतीर्थनगर व वडगाव या शाळांचा समावेश आहे.
येळ्ळूरवाडी शाळेत एलकेजी, यूकेजीचे वर्ग
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या उद्देशाने सरकारी शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एलकेजी व यूकेजी वर्ग सुरू केले जाणार आहेत. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूरवाडी या शाळेची यासाठी निवड करण्यात आली आहे. तालुक्यात केवळ एकाच शाळेची निवड करण्यात आली असल्याने मराठी भाषिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर एलकेजी, यूकेजी वर्ग सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.









