वृत्तसंस्था / अहमदाबाद
2024 च्या रणजी हंगामातील येथे इलाईट क गटातील सुरू असलेल्या सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर कर्नाटकचा संघ गुजरातवर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तिसऱ्या दिवसाअखेर गुजरातने 61 धावांची आघाडी दुसऱ्या डावात घेतली असून त्यांचे तीन गडी खेळावयाचे आहेत.
या सामन्यात गुजरातचा पहिला डाव 264 धावावर आटोपल्यानंतर कर्नाटकाने 5 बाद 328 या धावसंख्येवरून खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे पाच गडी 46 धावात बाद झाले. कर्नाटकाच्या पहिल्या डावात कर्णधार अगरवालने 109, समर्थने 60 तर मनीष पांडेने 88 धावांचे योगदान दिले. गुजरातर्फे चिंतन गजाने 3, तर सिद्धार्थ देसाई व वाघेला यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे फलंदाजी करू शकला नाही.
110 धावांनी पिछाडीवर असलेल्या गुजरातने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली पण कर्नाटकाच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांनी दिवसअखेर दुसऱ्या डावात 68 षटकात 7 बाद 171 धावा जमवल्या. कर्नाटकाच्या व्ही. कौशिकने 11 धावात 3 तर रोहितकुमारने 42 धावात 2 तसेच विशाख आणि हेगडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. गुजरातच्या दुसऱ्या डावात मनन हिंगारियाने 5 चौकारासह 56, एस. बग्गाने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 32, के. पटेलने 26 तसेच उमंगकुमारने 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 29 धावा जमवल्या.
संक्षिप्त धावफलक : गुजरात प. डाव सर्वबाद 264, कर्नाटक प. डाव सर्वबाद 374 (अगरवाल 109, समर्थ 60, मनीष पांडे 88, देवदत्त पडिकल 42, जोस 22, सुजय सातेरी 31, चिंतन गजा 3-65, नागवासवाला आणि वाघेला प्रत्येकी दोन बळी), गुजरात दु. डाव 68 षटकात 7 बाद 171 (मनन हिंगारिया 56, बग्गा 27, के. पटेल 26, उमंगकुमार खेळत आहे 29, कौशिक 3-11, रोहितकुमार 2-42, हेगडे व विशाख प्रत्येकी एक बळी).









