बसवाहक-प्रवासी वादावादीचा प्रकार चिघळला : दोन्ही राज्यातील सीमेवरील प्रवाशांची गैरसोय
प्रतिनिधी/ बेळगाव
सुळेभावी बसमध्ये घडलेल्या बसवाहक आणि प्रवाशांतील वादावादीचा प्रकार चिघळला आहे. त्यानंतर दुसऱ्या घटनेत चित्रदुर्ग जिल्ह्यात कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या बसचालक आणि एसटीला शुक्रवारी काळे फासले. त्याचे पडसाद उमटल्याने कर्नाटक-महाराष्ट्र राज्यांची आंतरराज्य बससेवा ठप्प झाली आहे. परिणामी दोन्ही राज्यांतील सीमेवरील प्रवाशांची गैरसोय झाली आहे. दरम्यान शनिवारी कोल्हापुरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बस अडवून चित्रदुर्ग येथील प्रकाराचा निषेध नोंदविला आहे. या प्रकारामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून याचा परिणाम बससेवेवर झाला आहे. खबरदारी म्हणून दोन्ही राज्यातील बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय दोन्ही परिवहन महामंडळांनी घेतला आहे.
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूरकडे धावणाऱ्या सर्व बसेस ठप्प झाल्या आहेत. शिवाय महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या बसेसही थांबविण्यात आल्या आहेत. शुक्रवारी बहुतांशी बसथांब्यावर प्रवासी अडकून पडल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवाशांना जावे लागले.
लाल परीही ठप्प
चंदगड, आजरा, गडहिंग्लज आगारातून बेळगावला येणारी लालपरी ठप्प झाली आहे. त्यामुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लज यासह सीमाहद्दीतील प्रवाशांची हेळसांड झाली. प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
कोकण बससेवाही ठप्प
बेळगावातून कोकणात धावणाऱ्या राजापूर, वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण या बसेसही थांबल्या आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची हेळसांड होत आहे. शिवाय कोकणातून बेळगावकडे येणाऱ्या महाराष्ट्राच्या बसेसही थांबल्या आहेत.
खासगी वाहनांनी उठविला फायदा
आंतरराज्य बससेवा ठप्प झाल्याने याचा फायदा खासगी वाहनांनी उठविला. शुक्रवारी कर्नाटक, महाराष्ट्र आंतरराज्य महामार्गावर धावणाऱ्या बसेस थांबविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. आंतरराज्य बससेवा कोलमडल्याने खासगी वाहने सुसाट धावताना दिसत आहेत. मात्र याचा प्रवाशांना फटका बसला.
कोल्हापूर विभागातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस रद्द : परिवहन मंत्री
शुक्रवारी रात्री कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकाला कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करतो. तथापि, प्रवासी व आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुढील अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार यांना दिले आहेत.
दरम्यान परिवहन मंत्री सरनाईक यांनी या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी दूरध्वनीवर बोलून त्यांना धीर दिला. तसेच ‘या प्रकरणात तुम्ही एकटे नसून, आपले सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे.’ अशी ग्वाही देखील दिली. तसेच कर्नाटक शासन या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत आपल्या शासनाची चर्चा करत नाही तोपर्यंत त्या भागातील महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात येतील., असे निर्देश देखील त्यांनी एसटी महामंडळाला यावेळी दिले.
21 फेब्रुवारी रोजी रात्री 9.10 वाजता मुंबई आगाराची बस बंगळुरू -मुंबई येत असतान ही बस चित्रदुर्गच्या पाठीमागे दोन किलोमीटर आली असता, कर्नाटक संघटनेच्या कार्यकर्ते यांनी गाडी थांबवून बस व चालकाला काळे फासले. तसेच कर्तव्यावर असणाऱ्या चालक भास्कर जाधव यांना मारहाण देखील करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या सुचनेनुसार त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली आहे. शनिवारी सकाळी विभाग नियंत्रक कोल्हापूर यांनी बस व चालक-वाहक यांना सुखरूप कोल्हापूर येथे आणले.
बसचालकाला काळे फासल्याप्रकरणी 10 जणांना अटक
बस कंडक्टरला मारहाण केल्याच्या निषेधार्थ कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्र.-48 वर महाराष्ट्र परिवहनची बस अडवून चालकाला काळे फासले. या घटनेप्रकरणी आयमंगल पोलिसांनी शनिवारी 10 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. बस चालकाने घटनेप्रकरणी आयमंगल पोलिसांत तक्रार दिल्यानंतर नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष तिप्पेस्वामी, लक्ष्मीकांत याच्यासह 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.









