वृत्तसंस्था/ भोपाळ
हॉकी इंडियाच्या 2022 सालातील येथे सुरू असलेल्या 12 व्या वरिष्ठ पुरूषांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा आणि तामीळनाडू यांनी आपले उपांत्यपूर्व फेरीचे सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटकाने बंगालचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. कर्नाटकातर्फे हॅरीष मुतगार, यतीशकुमार यांनी प्रत्येकी एक तर एस.पी. दीक्षितने दोन गोल नोंदविले. बंगालतर्फे ए.एम. तिर्की, कर्णधार किशोर लाक्रा आणि तरूण अधिकारी यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱया उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने झारखंडचा पेनेल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. पेनल्टी शूट आऊटमध्ये महाराष्ट्राने दोन तर झारखंडने एक गोल नोंदविला. तिसऱया उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हरयाणाने दिल्लीचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. हरियाणा संघातर्फे दीपक, रिंकू अँटील आणि पंकज यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. चौथ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तामीळनाडूने उत्तरप्रदेशवर 3-1 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली.









