खबरदारी म्हणून परिवहनचा निर्णय : सीमाहद्दीपर्यंतच बससेवा
बेळगाव : महाराष्ट्रात मराठा आरक्षण पेटले आहे. विविध ठिकाणी अनुचित प्रकार घडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा ठप्प करण्यात आली आहे. शिवाय 1 नोव्हेंबर कर्नाटकात राज्योत्सव दिन तर सीमाभागात काळादिन म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर आंतरराज्य बससेवा ठप्प करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात कर्नाटकची बस पेटविण्यात आली आहे. मराठा आरक्षणावरून हे कृत्य अज्ञातांनी केले आहे. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून महाराष्ट्रात धावणारी बससेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. बेळगावातून निपाणीपर्यंत बस धावू लागल्या आहेत. तेथून पुढे दुसऱ्या बसने कोल्हापूर गाठावे लागत आहे. आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान आरक्षणावरून संपूर्ण वातावरण तापले आहे. विविध ठिकाणी बसेस आणि वाहनांची जाळपोळ केली जात आहे. आमदार, मंत्री आणि खासदारांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. मराठा समाज मागणीवर ठाम असून आरक्षणासाठी रोष व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महाराष्ट्रात धावणाऱ्या कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, नाशिक या सर्व बसेस थांबविण्यात आल्या आहेत. पुढील आदेश आल्यानंतरच बससेवा सुरळीत केली जाणार आहे.
लालपरीही थांबली
कोकण, चंदगड आणि कोल्हापूर येथून बेळगावात येणारी लालपरीही ठप्प झाली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षणावरून बससेवेवर परिणाम झाला आहे. खबरदारी म्हणून चंदगड, कोल्हापूर आणि कोकणातील महामंडळांनी बेळगावकडे बस पाठविल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेऊन बेळगाव गाठावे लागले.









