बेंगळूर प्रतिनिधी
भाजप युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण नेत्तरू यांच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविला जाणार आहे याबाबतची माहीती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शुक्रवारी सांगितली. हा एक “आंतरराज्यीय संबंध असलेला एक संघटित गुन्हा” असल्याचे सांगून बोम्माई यांनी राज्याचे पोलिस प्रमुख प्रवीण सूद आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
“प्रवीण नेत्तरू हत्त्या प्रकरण हा आंतरराज्यीय संबंध असलेला संघटित गुन्हा असल्याचा संशय आहे. मी अधिकार्यांना या प्रकरणाची अधिक माहिती गोळा करण्याच्या सुचना केल्या आहेत. ही चौकशी तीव्र करण्यासाठी हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संबंधी गृहखाते योग्य तो पत्रव्यवहार करेल,” असे बोम्माई म्हणाले. सूरथकल येथील 23 वर्षीय मोहम्मद फाजील याच्या हत्येचा तपास अधिक तीव्र करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. “दोषींना अटक झालीच पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पथके तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला,” बोम्माई म्हणाले.