कर्नाटक मंत्रिमंडळाने गुरुवारी राज्याच्या शाळांमधील इयत्ता 6 वी ते 10 पर्यंतच्या सामाजिक विज्ञान आणि कन्नड पाठ्यपुस्तकांच्या सुधारणेला मंजुरी दिली असून या पाठ्यपुस्तकातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) संस्थापक केबी हेडगेवार आणि विदा सावरकर यांच्यावरील धडे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेस सरकारने या निर्णयाचे वर्णन भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत झालेल्या “इतिहासाचे विकृतीकरण” आणि “अभ्यासक्रमाचे भगवेकरण” सुधारण्याचा प्रयत्न असे केले आहे.
या बद्दल माहीती देताना राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा म्हणाले कि, “गेल्या वर्षी भाजपने जे काही बदल केले आहेत, ते आम्ही पुन्हा बदलले असून पुर्वी ज्या पद्धतीने होते ते पुन्हा सादर केले आहे. आम्ही नेहमीच असे म्हणत आलो आहोत की ठराविक अजेंडाला चालना देण्यासाठी आणि चुकीच्या इतिहासामुळे युवकांच्या मनावर प्रभाव टाकण्यासाठी पाठ्यपुस्तकांचा विपर्यास केला गेला. आम्ही ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
हेगडेवार आणि सावरकर यांच्या बरोबरच उजव्या विचारसरणीचे विचारवंत चक्रवर्ती सुलिबेले, संस्कृत आणि कन्नड विद्वान बनन्जे गोविंदाचार्य यांच्यावरील प्रकरणेही हटवण्यात येणार आहेत.
दरम्यान, थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आपली कन्या इंदिरा गांधी यांना लिहिलेले पत्र आणि गेल्या वर्षी काढण्यात वगळण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कविता यांच्यावरिल प्रकरणेही पुनर्संचयित करण्यात येणार आहेत. तसेच सरकारने सर्व शाळांना संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करणे देखील बंधनकारक केले आहे.